देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरुच असून मध्य प्रदेशमधील इंदौरमध्ये जिममध्ये तरुणीशी असभ्य वर्तन केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने जिम व्यवस्थापनाकडे तक्रार करताच संबंधीत तरुणाने जिममध्ये सर्वांसमक्ष तरुणीला मारहाण केली. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

इंदौरमध्ये राहणारी पीडित तरुणी दररोज जिममध्ये जाते. जिममध्ये व्यायाम करताना एका तरुणाने तिच्याशी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी पीडित तरुणीने जिम व्यवस्थापनाकडे तक्रार केली. यामुळे माथेफिरु तरुणाचा राग अनावर झाला आणि त्याने जिममध्ये सर्वांसमोरच तरुणीला मारहाण केली. जिममध्ये उपस्थित अन्य तरुणांनी त्याला रोखले आणि पुढील अनर्थ टळला. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाणीमुळे पीडित तरुणीला मानसिक धक्का बसला. याप्रकरणी इंदौर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मारहाण आणि छेड काढल्याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक शशिकांत कांकणे यांनी दिली.

इंदौरपूर्वी दिल्लीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरक्षा व्यवस्थापकाने महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केले होते. पवन दहिया असे या व्यवस्थापकाचे नाव होते. त्याने महिला कर्मचाऱ्याची साडी सोडण्याचा प्रयत्न केला होता. ही घटनादेखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी पवन दहियाला अटक केली आहे.

Story img Loader