डॉक्टर म्हणजे देव असे नेहमीच म्हटले जाते… पण याच डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये महिलेची प्रसूती करण्याऐवजी दोन डॉक्टरांमध्ये जोरदार भांडण सुरु होते. दुर्दैवी बाब म्हणजे या महिलेच्या बाळाचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांवर चहूबाजूंनी टीका होत आहे.

राजस्थानमधील जोधपूर येथील उमेद रुग्णालयात प्रसूतीसाठी एका गर्भवती महिलेला दाखल करण्यात आले होते. प्रसूतीसाठी महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. महिलेवर शस्त्रक्रिया सुरु असताना ऑपरेशन थिएटरमध्येच दोन डॉक्टरांमध्ये वाद झाला. या भांडणात डॉक्टरांना रुग्णाचाही विसर पडला. गर्भवती महिला ऑपरेशन टेबलवर असतानाही डॉक्टरांचे भांडण सुरुच होते. एकमेकांची ‘लायकी’ काढण्यापर्यंत हे भांडण पोहोचले. ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित अन्य कर्मचाऱ्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही डॉ़क्टरांमधील वाद काही थांबत नव्हता. एका कर्मचाऱ्याने हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. दु्र्दैवी बाब म्हणजे या महिलेच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाला, असा आरोप केला जात आहे.

ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णावर उपचार करण्याऐवजी डॉक्टरांनी वाद घालणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित आहे. अशा बेजबाबदार डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली होती. रुग्णालय प्रशासनानेही या व्हिडिओची दखल घेत दोन्ही डॉ़क्टरांवर निलंबनाची कारवाई केली आहे. ‘महिला रुग्णालयात दाखल झाली तेव्हा तिचा रक्तदाब कमी होता. तर बाळाच्या ह्रदयाचे ठोकेही मंदावले होते. आम्ही बाळाच्या मृत्यूची चौकशी करु’ असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. रुग्णालय प्रशासनानेही या व्हिडिओची दखल घेत दोन्ही डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

Story img Loader