व्यायामाचा अभाव आणि बैठय़ा जीवनशैलीचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होत असल्याचे आपल्याला माहीत होते. पण बराच काळ टेलिव्हिजन पाहत बसणे हेदेखील प्राणघातक ठरू शकते असे अहवाल एका अभ्यासाअंती लक्षात आले आहे. दिवसात ५ तासांपेक्षा अधिक वेळ टीव्ही पाहिल्यास फुप्फुसांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी होऊन हृदयविकाराचा झटका बसून (पल्मोनरी एम्बॉलिझम) मृत्यू ओढवू शकतो.
एका जागी फार वेळ बसल्याने अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो हे प्रथम दुसऱ्या महायुद्धात हवाई हल्ल्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून लंडनच्या भुयारी आश्रयस्थळांमध्ये लपणाऱ्या नागरिकांच्या बाबतीत लक्षात आले. त्यानंतर विमानाच्या इकॉनॉमी क्लासमधून लांब अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही असा त्रास होत असल्याचे दिसून आले. त्याला इकॉनॉमी क्लास सिंड्रोम असे म्हणतात, असे जपानच्या ओसाका विद्यापीठातील आरोग्यविषयक संशोधक तोरू शिराकावा यांनी सांगितले.
या त्रासाची लक्षणे अचानक दिसून येतात. शक्यतो पायांतील रक्तवाहिन्यांमध्ये तयार झालेल्या रक्ताच्या गुठळ्या फुप्फुसातील रक्तवाहिन्यांत जाऊन अडकून बसल्याने हा त्रास होतो. त्यात श्वास घेण्यात त्रास होतो आणि छातीत दुखू लागते. त्रास वाढल्यास हृदयविकाराचा धक्का येऊ शकतो.
या संदर्भात १९८८ ते १९९० या काळात ८६,०२४ नागरिकांवर प्रयोग करण्यात आला. त्यांची २००९ सालापर्यंत सतत देखरेख करण्यात आली. यातील व्यक्तींना अडीच तास टीव्ही पाहणे, अडीच ते ५ तास आणि ५ तासांपेक्षा अधिक टीव्ही पाहणाऱ्यांमध्ये विभागणी करण्यात आली. रोज पाच तासांपेक्षा अधिक काळ टीव्ही पाहणाऱ्यांना या त्रासाचा धोका अधिक असल्याचे दिसून आले. तसेच यावर वयाचाही परिणाम होतो असे दिसून आले. वयाची साठी उलटल्यानंतर दिवसात ५ तासांपेक्षा जास्त टीव्ही पाहिला तर धोक्याची पातळी नेहमीच्या व्यक्तींपेक्षा ६ पटीने अधिक असते. तर साठीनंतर रोज अडीत तास टीव्ही बघितला तर धोका तीन पट अधिक असतो असे अभ्यासात दिसून आले.