पॉर्न बघून सात वर्षाच्या काळात एकूण ३० अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करणाऱ्या विकृताला अखेर दोषी ठरवण्यात आलं आहे. येत्या दोन आठवड्यात नराधम आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे. दोषीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी पीडित मुलींच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. रवींद्र कुमार असं दोषी आढळलेल्या विकृताचं नाव आहे.
रवींद्र कुमार हा उत्तर प्रदेशातील कासगंज येथील रहिवाशी असून तो २००८ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी कामाच्या शोधात दिल्लीत आला होता. त्याचे वडील प्लम्बरींगचं काम करायचे तर आई इतरांच्या घरात घरकाम करून उदरनिर्वाह चालवायची.
रवींद्र कुमारने दिल्लीत आल्यानंतर मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली. कालांतराने त्याला अमली पदार्थांचं सेवन करायची सवय झडली. दरम्यान, तो अश्लील चित्रपट बघायचा आणि लैंगिक अत्याचार करण्यासाठी अल्पवयीन मुलींचा शोध घ्यायचा. अल्पवयीन मुलगी एकटी आढळली तर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कुमार हा दिवसभर मजूर म्हणून काम करायचा आणि संध्याकाळी अमली पदार्थांची नशा करायचा. त्यानंतर रात्री ८ ते मध्यरात्रीपर्यंत तो झोपडपट्टीत अल्पवयीन मुलींचा शोध घ्यायचा. बलात्कार करता यावा, यासाठी अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी तो कधीकधी ४० किलोमीटरपर्यंत बांधकाम इमारती आणि झोपडपट्ट्यांभोवती फिरत असे. लहान मुलींना तो दहा रुपयांच्या नोटा आणि चॉकलेटचे आमिष दाखवून एखाद्या निर्जनस्थळी घेऊन जायचा आणि बलात्कार करायचा. ६ ते १२ वयोगटातील मुलींना तो आपल्या हवसचा शिकार बनवायचा.
२००८ मध्ये नराधमाने स्वत: ही एकप्रकारे दिनचर्याच विकसित केली होती. २००८ पासून २०१५ पर्यंत रवींद्र कुमारने सात वर्षांच्या काळात एकूण तीस अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली. २०१५ साली दिल्ली पोलिसांनी नराधमाला अटक केली. एका सहा वर्षीय चिमुकलीचं अपहरण, खून, शारीरिक अत्याचार प्रकरणात आज अखेर त्याला दोषी ठरवण्यात आलं. दोषी रवींद्र कुमारला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
नराधमाला दोन वेळा अटक
रवींद्र कुमारला दिल्ली पोलिसांनी सर्वप्रथम २०१४ मध्ये अटक केली होती. त्यावेळी त्याच्यावर ६ वर्षाच्या मुलीचं अपहरण, खुनाचा प्रयत्न आणि शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप होता. नराधमाने चिमुकलीचं अपहरण केल्यानंतर तिला सेप्टिक टँकमध्ये फेकून दिलं होतं.
यानंतर, २०१५ मध्ये सहा वर्षीय मुलीच्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी त्याला दिल्लीच्या रोहिणी येथील सुखबीर नगर बसस्थानकाजवळून अटक केली. रवींद्र कुमारला पकडण्यापूर्वी पोलिसांनी डझनभर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बेड्या ठोकल्या. त्याने चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा चिरून तिला सेप्टिक टँकमध्ये फेकून दिलं होतं.