चंद्राच्या प्राचीन खडकात आढळून आलेले पाणी हे मूळ पृथ्वीवरचे आहे. आघातामुळे चंद्राची निर्मिती झाली तेव्हाही ते नष्ट न होता तसेच राहिले, असे नवीन संशोधनात म्हटले आहे. चंद्राच्या आंतरभागासह बराच भाग अपोलो मोहिमेच्या वेळी दिसून आला त्यापेक्षा ओलसर असल्याचे लक्षात आले आहे. ब्रिटनमधील द ओपन युनिव्हर्सिटीच्या जेसिका बार्नेस व त्यांच्या सहकाऱ्यांनी चंद्रावरील कवचात असलेल्या अ‍ॅपटाइट, कॅल्शियम फॉस्फेट या खनिज द्रव्यातील पाण्याच्या प्रमाणाचा शोध घेतला असता त्यांना असे दिसून आले की, यातील अनेक खडक हे फार प्राचीन म्हणजे पृथ्वीवर आढळलेल्या खडकांपेक्षा जुन्या काळातील आहेत. त्यामुळे हे खडक चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यास उपयुक्त आहेत. चंद्राची निर्मिती साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली होती त्या वेळी तेथे पाणी होते. सौरमालेतून पाणी नेमके कुठून आले याचाही शोध या खडकांच्या नमुन्यांच्या आधारे घेता येतो. चंद्रावरील अ‍ॅपटाइट खनिजाच्या स्फटिकात्मक रचनेत पाणी लक्षणीय प्रमाणात दिसून येते असे बार्नेस व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटले आहे. या खडकातील हायड्रोजन समस्थानिकाचे विशिष्ट गुणधर्मही तपासण्यात आले असून त्याची मदत पाण्याचा स्रोत ओळखण्यासाठी घेतली गेली.
साम्य काय?
हायड्रोजन समस्थानिकाचे हे गुणधर्म पृथ्वीवरील व काही काबरेनेशियस चोंड्राइट उल्कापाषाणासारखेच आहेत. चंद्रावरील नमुन्यात असलेली हायड्रोजन रचना व पृथ्वीवरील जलसाठय़ातील हायड्रोजनची रचना यात साम्य आहे, त्यामुळे चंद्र व पृथ्वी यांच्यातील पाण्याचा स्रोत एकच आहे. अपोलो मोहिमेच्या वेळी चंद्रावरील काही खडक आणण्यात आले होते, त्यांच्या आधारे बार्नेस यांनी केलेले संशोधन युरोपियन प्लॅनेटरी सायन्स काँग्रेसमध्ये लंडन येथे सादर करण्यात आले.

Story img Loader