भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी हिरवा कंदील दाखविल्याने नितीन गडकरी यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या फेरनियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. गडकरी यांना पक्षाध्यक्षपदी मुदतवाढ देण्याबाबतची पक्षांतर्गत कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे.
गडकरी यांच्या नावाला सरसंघचालक मोहन भागवत यांचा भक्कम पाठिंबा होता. भाजपचे अध्यक्षपद सलग दोन वेळा भूषविता येणे पक्षाच्या घटनेनुसार शक्य नसल्याने गडकरी यांच्यासाठी त्यात संबंधित दुरुस्तीही करण्यात आली, मात्र त्या दरम्यान गडकरी यांच्या मालकीच्या पूर्ती कारखान्याला झालेल्या संशयास्पद अर्थसहाय्यामुळे तसेच गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे व्यावसायिक संबंध असल्याच्या आरोपांमुळे गडकरी यांना सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद देऊ नये, अशी भूमिका अडवाणी यांनी घेतली होती. या पाश्र्वभूमीवर, अडवाणी आणि संघनेत्यांमध्ये बरेच दिवस चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. अडवाणी यांनी गडकरी यांना पर्याय म्हणून रविशंकर प्रसाद यांचे नावही सुचविले होते, मात्र या नावाला पक्षातून फारसा पाठिंबा लाभला नाही. पक्षाध्यक्षपदासाठी भाजपच्या नेत्यांनी सुषमा स्वराज यांचाही विचार केला, मात्र यासाठी त्या स्वत:च इच्छुक नसल्याने ते नावही मागे पडले. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नावही या पदासाठी चर्चेत होते, परंतु मोदीही यासाठी इच्छुक नव्हते, याशिवाय पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीत त्यांना अडकवण्यापेक्षा पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकींदरम्यान त्यांच्यावर निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविणे योग्य ठरेल, असा जोरदार मतप्रवाह भाजपमध्ये होता.या परिस्थितीचा लाभ झाल्याने गडकरी यांना या पदासाठी विरोधकच उरला नाही.
गडकरी यांच्या फेरनियुक्तीचा मार्ग मोकळा
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी हिरवा कंदील दाखविल्याने नितीन गडकरी यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या फेरनियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. गडकरी यांना पक्षाध्यक्षपदी मुदतवाढ देण्याबाबतची पक्षांतर्गत कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे.
First published on: 21-01-2013 at 02:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Way of reappointment of gadkari is clear