Wayanad Landslide: देवभूमी म्हणून ओळख असलेल्या केरळमध्ये निसर्गाचे थैमान पाहायला मिळाले. वायनाड जिल्ह्यातील काही गावांमध्ये ३० जुलै रोजी भीषण भूस्खलन झाले. त्यामुळे तीन ते चार गावे बाधित झाली. या दुर्घटनेत २१९ मृत्यू झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. तर शेकडो नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. भूस्खलन झाल्यानंतर यंत्रणेकडून बचाव कार्य सुरू असताना शेकडो लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. चार दिवसांनंतर जेव्हा हे लोक पुन्हा आपल्या घरी परतले तेव्हा त्यांना धक्का बसला. अनेकांच्या घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. आधीच भूस्खलनामुळे स्वकीय गमावलेल्या नागरिकांच्या मनात आता सर्वस्व गमावल्याची भावना निर्माण झाली आहे.
भूस्खलन झाल्यानंतर येथील नागरिकांना बचाव पथकाने सुरक्षेच्या कारणास्तव घरातून बाहेर काढून निवारा केंद्रात हलविले होते. चार दिवसांनंतर जेव्हा नागरिक पुन्हा घरी परतले, तेव्हा त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू गहाळ झाल्या असल्याचे लक्षात आले. अनेक स्थानिकांनी आता याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे. केरळच्या सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तीदरम्यान चोरांनी आपले उखळ पांढरे करून घेतल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.
सर्वस्व गमावलेल्या नागरिकांनी चोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी जे अनोळखी लोक या परिसरात शिरत आहेत, त्यांच्यावर नजर ठेवण्याची मागणी केली जात आहे. माध्यमांशी बोलतानाही येथील लोकांनी आपली व्यथा मांडली.
गावकरी म्हणाले की, सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला नाईलाजाने आमचे घर सोडावे लागले होते. पण जेव्हा आम्ही परत आलो, तेव्हा आमच्या घराचे दार तोडल्याचे लक्षात आले. तसेच घरातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. एवढेच नाही तर चोरट्यांनी घरातील कपडेही चोरले आहेत. त्यामुळे आधीच भूस्खलनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसमोर मोठ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत.
पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली असून रात्रीच्या वेळी परिसरात गस्त वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच चोरट्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असेही पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा >> वायनाडमधील भूस्खलनात ४ गावं झाली उद्ध्वस्त; नद्या व चिखलात लोकांचे अवयव सापडले, मन हेलावून टाकतील ही छायाचित्रे
बचाव कार्य सुरूच..
दरम्यान भूस्खलन झालेल्या परिसरात शनिवारीही बचाव कार्य सुरू ठेवण्यात आले. आधुनिक रडार, ड्रोन अशी उपकरणे वापरून गाळात अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. स्थानिकांकडून अजूनही काही लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शोधमोहीम सुरू आहे. राज्य सरकारने बाधित नागरिकांसाठी पुनर्वसन योजना घोषित केली असून पीडितांसाठी नवी घरे बांधून दिली जाणार आहेत.
भूस्खलन झालेल्या ठिकाणी विविध यंत्रणेचे १३०० जवान कार्यरत आहेत. यामध्ये एनडीआरएफ, के-९ डॉग स्कॉड, लष्कर, विशेष तपास पथक, मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप, पोलीस, अग्निशमन विभाग, वन विभाग, नौदल आणि सागरी सुरक्षा दलाचे जवान याठिकाणी तैनात केले गेले आहेत.