Wayanad landslides : केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडीमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक रहिवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपदेखील सुरु झाल्याचं दिसून येत आहे. अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना केरळ सरकारला अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याचा दावा केला होता. या दाव्यावर आता केरळच्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे.
अमित शाह नेमकं काय म्हणाले होते?
वायनाडमधील दुर्घटनेचे पडसाद आज संसदेतदेखील उमटल्याचे बघायला मिळालं. यावेळी विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. त्यानंतर विरोधकांच्या टीकेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही प्रत्युत्तर दिले. “मला वाटलं की आज सभागृहात राजकीय चर्चा होणार नाही. परंतु, विरोधकांनी नेहमीप्रमाणे आमच्याविरोधात टिप्पण्या केल्या. विरोधक म्हणाले, आम्ही सावधानतेचा इशारा द्यायला हवा होता. मात्र आम्ही केरळ सरकारला २३ जुलै रोजी अर्ली वॉर्निंग (दुर्घटनेपूर्वी सावधानतेचा इशारा) दिला होता. २३, २४, २५ आणि २६ जुलै रोजी आम्ही केरळ सरकारला इशारा दिला होता” असा दावा त्यांनी केला.
Wayanad landslide : वायनाड येथील भूस्खलनाची कारणे काय? संशोधकांनी नोंदवले निरीक्षण
अमित शाह यांच्या दाव्यावर केरळचे मुख्यमंत्री म्हणाले..
अमित शाह यांच्या दाव्यावर आता केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी फेटाळून लावला आहे. असा कोणताही इशाहा केंद्र सरकारकडून मिळाला नसल्याचे ते म्हणाले. ही वेळ सध्या आरोप प्रत्यारोप करण्याची नाही. मात्र, वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून असा कोणताही इशारा केरळ सरकारला मिळाला नव्हता. हवामान विभागाने फक्त ऑरेंज अलर्ट जारी केला होता. रेड अलर्ट मंगळवारी सकाळी भूस्खलनाची घटना घडल्यानंतर मिळाला, असे ते म्हणाले.
आतापर्यंत १६० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू
दरम्यान, वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडीमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत १६० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही शेकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. तसेच जखमी झालेल्या लोकांची संख्या वाढली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत अद्यापही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. सध्या एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे. मात्र, खराब हवामान आणि पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी चर्चा
वायनाड जिल्ह्यात झालेल्या या भूस्खलनाच्या घटनेचा तब्बल ४ पेक्षा जास्त गावांना फटका बसला आहे. जे यामध्ये अडकले आहेत, त्यांची सुटका करण्यासाठी आणि मदतीसाठी एनडीआरएफची टीम, राज्याचे आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), स्थानिक प्रशासन, पोलीस, नौदल, अग्निशमन दल आणि भारतीय लष्कराकडूनही मदतकार्य सुरु आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी संवाद साधून या घटनेची माहिती घेत सर्वतोपरी मदत केंद्र सरकारकडून करण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं आहे.
मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर
केरळ सरकारने वायनाडमधील भूस्खलनाच्या दुर्घटनेनंतर दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.