Wayanad landslides Amit Shah speech in Lok sabha : भारताचं दक्षिणेकडील राज्य केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं असून वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडीमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक रहिवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात असून एनडीआरएफ व स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य, शोधमोहीम चालू आहे. मातीच्या ढिगाऱ्यांखालून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामुळे मृतांची सख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खराब हवामान आणि पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत असल्याचं सांगितलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, केरळमधील या घटनेचे संसदेतही पडसाद उमटले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत यावर भाष्य केलं. शाह म्हणाले, “या दुर्घटनेत ज्या लोकांनी आपला जीव गमावला आहे मी त्यांना श्रद्धांजली वाहतो.” शाह लोकसभा अध्यक्षांना उद्देशून म्हणाले, “तुम्ही या विषयावर चर्चा करण्याची परवानगी दिल्यानंतर मला वाटलं की आज सभागृहात राजकीय चर्चा होणार नाही. परंतु, विरोधकांनी नेहमीप्रमाणे आमच्याविरोधात टिप्पण्या केल्या. विरोधक म्हणाले, आम्ही सावधानतेचा इशारा द्यायला हवा होता.”

केंद्र सरकारने चार वेळा इशारा दिला होता : शाह

गृहमंत्री म्हणाले, “अर्ली वॉर्निंग, अर्ली वॉर्निंगचा उल्लेख करत मोठमोठी इंग्रजी वाक्ये वापरून विरोधक टीका करत आहेत. परंतु, आम्ही केरळ सरकारला २३ जुलै रोजी अर्ली वॉर्निंग (दुर्घटनेपूर्वी सावधानतेचा इशारा) दिला होता. २३, २४ व २५ जुलै रोजी आम्ही केरळ सरकारला इशारा दिला होता. २६ जुलै रोजी आम्ही म्हटलं होतं की २० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस होईल. भूस्खलनही होऊ शकतं, यात लोक मातीच्या ढिगाऱ्यांखाली दबून मरू शकतात. आम्ही केरळ सरकारला दिलेला सावधानतेचा इशारा एकदा वाचून घ्या आणि मग आमच्यावर टीका करा.”

हे ही वाचा >> Wayanad landslide : वायनाड येथील भूस्खलनाची कारणे काय? संशोधकांनी नोंदवले निरीक्षण

पटनाटक व ममता सरकारचं कौतुक

गृहमंत्री अमित शाह म्हणाले, आम्ही यापूर्वी देखील पूर्वसूचना दिली होती. ओडिशात मोठं वादळ येऊन गेलं, मात्र आम्ही त्याच्या सात दिवस आधीच पूर्वसूचना दिली होती. तेव्हा ओडिशात आमचं सरकार नव्हतं. ओडिशात नवीन पटनायक यांचं सरकार होतं. त्यांच्या सरकारने उत्तम काम केलं. त्या वादळात केवळ एक व्यक्ती दगावली होती. आम्ही पश्चिम बंगाल सरकारलाही पूर्वसूचना दिली होती. तिथल्या सरकारनेही चांगलं काम केलं. तिथे मानवी हानी झाली नाही, केवळ सात गुरं दगावली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wayanad landslides amit shah says center givem early warning to kerala govt asc