Wayanad landslides School girl Story on natural disaster turns real : केरळमधील वायनाड जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी भूस्खलनाच्या दोन घटना घडल्या. या दुर्घटेत २९९ जणांचा बळी गेला आहे. तसेच १९० हून अधिक नागरिक जखमी झाले असून २०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. राज्य शासन व केंद्र सरकारची बचाव पथकं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस व अग्निशमन दलही या बचाव मोहीमेत उतरलं असून ते बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. अशातच एक वेगळी बातमी समोर आली आहे. वायनाडमधील एका शाळेतील आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने काही महिन्यांपूर्वी शाळेच्या मासिकात अशाच एका नैसर्गिक आपत्तीचा उल्लेख केला होता. लाया असं तिचं नाव असून तिने लिहिलेली लघुकथा खरी ठरल्याची चर्चा होऊ लागली आहे.
लाया ही आठवी इयत्तेत शिकते. गेल्या वर्षी तिच्या शाळेच्या मासिकात तिने तिच्याच वयाच्या एका मुलीची गोष्ट लिहिली होती. तिच्या गोष्टीतली मुलगी गावाजवळच्या धबधब्याजवळ जाते आणि त्या धबधब्यात पडून मरते. मात्र तीच मुलगी एक पक्षी बनून गावात परत येते. गावातील लोकांना पूराच्या धोक्याबद्दल सूचित करते. ती पक्षी बनून गावातील मुलांना भेटते व सांगते, “इथून (गावातून) पळून जा. पुढे मोठा धोका आहे”. मुलं देखील तिचं ऐकून पळत सुटतात आणि एका टेकडीजवळ येऊन थांबतात. तिथे टेकडीवरून मोठ्या वेगाने वाहणारं पावसाचं पाणी पाहतात. त्याचवेळी तो पक्षी एका सुंदर मुलीमध्ये रुंपातरीत होतो व काही क्षणात गायब होतो.
हे ही वाचा >> केरळ भूस्खलन,मृतांची संख्या २९९; राहुल, प्रियंका यांच्याकडून पाहणी
लायाचं चूरामला हे गाव भूस्खलनानंतर भुईसपाट झालं आहे. या नैसर्गिक आपत्तित तिचे वडील लेनिन मारले गेले आहेत. लायाच्या शाळेतील ३२ मुलं दगावली आहेत. तर तिच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी त्यांचे आई-वडील व भावंडं गमावली आहेत. लायाच्या शाळेच्या अनेक खोल्या कोसळल्या आहेत. शाळेजवून वाहणाऱ्या नदीचं पाणी शाळेत शिरलं असून शाळेतील बरचसं साहित्य वाहून गेलं आहे.
हे ही वाचा >> Andhra Pradesh : क्रूरतेचा कळस! कर्ज न फेडल्यामुळे फायनान्स कंपनीच्या एजंटांकडून अल्पवयीन मुलाचं अपहरण, आईशी गैरवर्तन
लायाच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, “त्या दिवशी आम्ही शाळेत थांबलो असतो तर…”
लायाच्या शाळेचे मुख्याध्यापक व्ही. उन्नीकृष्णन म्हणाले, पाऊस आता कमी झालाय, त्यामुळे आम्हाला वाटतं की आमची या संकटातून सुटका झाली आहे. आम्ही पाच शिक्षक चूरामला येथे भाड्याने राहतो. आमच्या घराच्या मागे एक उंच टेकडी आहे. आठवडाभरापूर्वी मुसळधार पाऊस पडत होता. भूस्खलनाच्या भीतीने आम्ही त्या दिवशी शाळेत थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र काही वेळाने आम्ही घरी परतलो. त्याच दिवशी नदीचं पाणी शाळेत शिरलं आणि शाळेजवळ भूस्खलन झालं. आम्ही तेव्हा शाळेत असतो तर ठार झालो असतो.