युक्रेनची राजधानी किव्हवर रशियाचे हल्ले वाढत आहे. रशियन सैन्य किव्हच्या दिशेने जात आहे. यादरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आपण किव्हमध्येच थांबणार असून कुटुंबीय देखील किव्हमध्येच आहेत, असं स्पष्ट केलं होतं. आपण देश सोडून पळून जाणार नसल्याचं ते म्हणाले होते. अशातच झेलेन्स्की यांनी शुक्रवारी किव्हमधून एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत त्यांनी रशियन आक्रमणापासून किव्हचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे.
“मी तर ज्यू आहे, नाझी कसा असेन?” युक्रेनच्या अध्यक्षांनी खोडला पुतीन यांचा दावा!
“आम्ही सर्व इथे आहोत. आमचे सैन्य इथं आहे. आपल्या समाजातील नागरिक येथे आहेत. आम्ही सर्व इथे आमच्या स्वातंत्र्याचे, आमच्या देशाचे रक्षण करत आहोत, आणि कायम इथे असेच उभे राहू,” असं झेलेन्स्की राष्ट्रपती भवनाच्या बाहेर उभे राहून म्हणाले आहेत. युक्रेनच्या संरक्षण विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून झेलेन्स्की यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ऑलिव्ह ग्रीन रंगाचा लष्करी पोशाख परिधान केला असून ते त्यांचे पंतप्रधान, प्रमुख कर्मचारी आणि इतर सहाय्यकांसोबत उभे आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दबावाला या व्हिडीओतून ते प्रत्युत्तर देत आहेत.
“मला माहिती आहे ते माझ्यासाठीच येतायत”
वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये रशियाच्या हल्ल्यापुढे नमणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. “शत्रूनं (रशिया) मला त्यांचा नंबर वन टार्गेट केलं आहे. माझं कुटुंब हे त्यांचं नंबर दोनचं टार्गेट आहे हेही मला माहिती आहे. त्यांना युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखालाच लक्ष्य करून युक्रेनला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करायचं आहे. पण मी कुठेही पळून जाणार नाही. मी राजधानीतच राहणार आहे. माझं कुटुंब देखील युक्रेनमध्येच आहे”, असं वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हटलं होतं.