नवी दिल्ली : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील प्रत्येक संस्था आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यामुळे आता काँग्रेसची लढाई केवळ भाजप आणि संघाशीच नव्हे तर ‘इंडियन स्टेट’शीही (भारतीय राज्य यंत्रणा) आहे, असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केले. त्यांच्या विधानातील ‘इंडियन स्टेट’ या शब्दांकडे बोट दाखवत भाजपने राहुल यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. शहरी नक्षल, विभाजनवादी, देशविरोधी अशा शब्दांमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींची निर्भर्त्सना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीतील कोटला मार्गावरील काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी केलेल्या भाषणात राहुल गांधींनी संघ-भाजपच्या विचारसरणीविरोधातील काँग्रेसच्या लढाईची तीव्रता स्पष्ट करताना भारतीय राज्य यंत्रणेशीही लढावे लागत असल्याचे मत व्यक्त केले. ‘संघाच्या विचारसरणीप्रमाणे आपली (काँग्रेस) विचारसरणीही हजारो वर्षे जुनी आहे आणि ती हजारो वर्षांपासून संघाच्या विचारसरणीशी लढत आहे. ही तुल्यबळ लढाई नाही. तुम्हाला असे वाटत असेल की आपण भाजप किंवा संघ नावाच्या राजकीय संघटनेशी लढत आहोत, तर देशात काय चालले आहे, हे तुम्हाला समजू शकलेले नाही. भाजप आणि संघाने आपल्या देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे. आता आपण भाजप, संघ आणि भारतीय संघ-राज्याशीही लढत आहोत’, असे राहुल गांधी म्हणाले. भाषणादरम्यान त्यांनी निवडणूक आयोगासह अन्य सरकारी यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या दुजाभावावर टीका केली.

हेही वाचा >>> Uttar Pradesh : हेल्मेट न घातल्याने पेट्रोल नाकारले, संतप्त लाइनमनने थेट पेट्रोल पंपाची वीजच खंडीत केली; प्रशासने दिले चौकशीचे आदेश

राहुल यांच्या विधानानंतर नवा वाद उद्भवण्याची चिन्हे असून भाजपने त्यांच्यावर चहुबाजूने हल्ला चढवला आहे. काँग्रेसचा देशविरोधी खरा अजेंडा उघड झाला, अशी टीका भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. ‘राहुल गांधी आणि त्यांच्या अवतीभवतीच्या परिघातील व्यक्तींचे शहरी नक्षलवाद्यांशी आणि ‘डीप स्टेट’शी (असंविधानिक सरकारविरोधी घटक) जवळचे संबंध आहेत. हेच घटक भारताला बदनाम करू इच्छितात, कमी लेखू इच्छितात. या घटकांशी राहुल गांधींचे असलेले संबंध लपून राहिलेले नाहीत. राहुल गांधींची कृती वा विधाने भारताचे तुकडे करण्याच्या आणि समाजाचे विभाजन करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे’’ अशी टीका नड्डांनी केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘संविधानाच्या साक्षीने शपथ घेणारा विरोधी पक्ष नेताच आपली लढाई ‘इंडियन स्टेट’शी असल्याचे म्हणतो’ अशी टिप्पणी करत ‘संविधानाची प्रत जवळ का बाळगता’ असा सवाल राहुल यांना केला.

मोहन भागवतांचे वक्तव्य हा देशद्रोह

‘अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले’ या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर हल्ला चढवताना राहुल म्हणाले, ‘सरसंघचालकांचे हे वक्तव्य देशद्रोह असून इतर कोणत्याही देशात असे विधान कोणी केले तर त्यांना अटक करून खटला चालवला जाईल हा जनतेचा, स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे.’

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We are fighting bjp rss and the indian state itself says rahul gandhi zws