करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ आज साधेपणानेच साजरा होत आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता. या घटनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्विटवरुन महाराष्ट्रातील जनतेला मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.
देशातील जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे असं मोदींनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. “महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र!”, असं ट्विट मोदींनी केलं आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र !
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2020
महाराष्ट्र दिनाबरोबर मोदींनी गुजरातमधील नागरिकांनाही गुजरात स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुजराती लोकांनी नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले योगदान दिले आहे, असं मोदींनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ગુજરાતની જનતાને રાજ્યના સ્થાપના દિવસની ખૂબ ખૂબ શુભેચ્છાઓ ! ગુજરાતની પ્રજા પુરુષાર્થ માટે જાણીતી છે. ગુજરાતીઓએ ઘણાં બધાં ક્ષેત્રોમાં વિશેષ યોગદાન આપ્યું છે. ગુજરાત સદૈવ સિદ્ધિઓનાં નવાં શિખરો સર કરતું રહે એવી મનોકામના… જય જય ગરવી ગુજરાત !
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2020
संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात १०५ हुतात्म्यांचे बलिदान गेल्याने महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्र दिनाकडे जिव्हाळय़ाने व भावनिकदृष्टय़ा पाहात आली आहे. त्यावेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा निर्णय करून घेण्यात यशवंतराव चव्हाण यशस्वी झाले होते. दिल्लीतील प्रमुख नेत्यांची मान्यता मिळाल्याने १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यावेळच्या ऐतिहासिक कार्यक्रमात यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणून त्याचे पूजन केले होते. अशा या ऐतिहासिक क्षणाचा आज हीरक महोत्सव असूनही महाराष्ट्र दिन म्हणून दरवर्षी दिमाखात साजरा होणारा हा दिवस सध्या करोना विषाणूच्या ग्रहणामुळे अतिशय साधेपणानेच साजरा होताना दिसत आहे.