राफेल करारावरुन काँग्रेस आणि भाजपामधील शाब्दीक लढाई दिवसेंदिवस आणखी तीव्र होऊ लागली आहे. जनमानसात सरकारच्या प्रतिमेबद्दल संशय निर्माण करण्याचे काँग्रेसचे जे प्रयत्न सुरु आहेत, ती लढाई लढण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे. तथ्याच्या आधारावर काँग्रेसचे सर्व आरोप आम्ही खोडून काढू असा दावा संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी केला आहे.
ही दृष्टीकोनाची लढाई आहे. आम्ही ही लढाई लढणार. आम्ही देशभरात जाऊन राफेल संबंधी तथ्य लोकांसमोर मांडू. काँग्रेसने आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्या सरकारची प्रतिमा खराब करण्याची रणनिती आखली आहे असे सीतारमन म्हणाल्या. राफेल करारावरुन काँग्रेसकडून भाजपावर हल्लाबोल सुरुच आहे. राफेल विमानांच्या किंमती का नाही जाहीर केल्या ? अनिल अंबानींना हे कंत्राट कसे मिळाले असे प्रश्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना विचारले आहेत.
This is a perception battle. We will fight this battle. We'll go to places and state facts on record on Rafale. Congress designs to run a smear campaign against us at an international level: Defence Minister Nirmala Sitharaman (File pic) pic.twitter.com/myn6kZvbts
— ANI (@ANI) September 24, 2018
भाजपाने या लढाईत आता सोनिया गांधींचे जावई रॉबट वाड्रा यांना खेचले आहे. काँग्रेसला शस्त्रास्त्रांचा वादग्रस्त डीलर संजय भंडारीला मदत करायची असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शस्त्र सज्ज लढाऊ विमान आणि विना शस्त्र लढाऊ विमानाच्या किंमतीची तुलना करुन देशाची दिशाभूल करत आहेत. सध्याचा राफेल करार हा काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारच्या तुलनेत २० टक्के स्वस्त आहे असे भाजपाकडून सांगण्यात आले.