देशात एकीकडे करोनाच संकट असताना दुसरीकडे इंधन दर गगनाला भिडत असल्याने, नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. अनेक शहरांमध्ये तर पेट्रोलने शंभरी देखील ओलांडली आहे. तरी देखील इंधन कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील इंधन दर वाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे. यावर आता केंद्रीयमंत्री पेट्रोलियम धर्मेंद्र प्रधान प्रत्युत्तर देत, इंधन दरवाढीबद्दल एकप्रकारे खुलासा केला आहे.
या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, राहुल गांधींनी इंधन दर वाढीवरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, “राहुल गांधींनी अगोदर उत्तर द्यावं, त्याचा पक्ष सत्तेत असलेल्या महाराष्ट्रात इंधन दरात वाढ का आहे? राजस्थान, पंजाबमध्ये का इंधन दर वाढ झालेली आहे? अशी बेजबाबदार वक्तव्य राहुल गांधींच करू शकतात. मी हे मान्य करतो की आजच्या इंधन दरामुळे नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. यामध्ये कोणतेही दुमत नाही. मात्र भारत सरकार असो किंवा राज्य सरकारं करोनामध्ये जवळपास ३५ हजार कोटींपेक्षा अधिक वर्षभराच्या आत लसीकरणावर खर्च होत आहे. अशातच एक लाख कोटी रुपये खर्च करून पंतप्रधानांनी आठ महिन्यांसाठी मोफत धान्य देण्यासाठी, पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली आहे. पीएम किसान योजनेद्वारे हजारो कोटी रुपये देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट पोहचवले आहेत. मी याच वर्षीबाबत बोलत आहे.”
Rahul Gandhi must answer why fuel prices are high in Congress-ruled states like Punjab, Rajasthan, & Maharashtra. If he is so concerned about the poor, he should instruct Maharashtra CM to reduce taxes as prices are very high in Mumbai: Union Petroleum Minister Dharmendra Pradhan pic.twitter.com/rSTq9QSIKl
— ANI (@ANI) June 13, 2021
तसेच, “आता शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेत, तांदूळ व गव्हाच्या एमएसपीची घोषणा केली गेली आहे. हे सर्व खर्च आता व त्या शिवाय देशात रोजागार निर्मितीसाठी विकासकामं होण्यासाठी गुंतवणुकीची आवश्यकता भासत आहे. या कठीण काळात, आम्ही पैसे वाचवून लोक कल्याणाच्या कामात लावले. जर राहुल गांधींना गरिबांबद्दल एवढीच कळवळ चिंता आहे, तर त्यांना आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आदेश द्यावा. आज मुंबईत सर्वात महाग पेट्रोल यामुळे आहे की महाराष्ट्राचा कर देशात सर्वात जास्त आहे. राजस्थानचा कर पेट्रोलवर सर्वात जास्त आहे.” असं धर्मेंद्र प्रधान यांनी बोलून दाखवलं.
पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याची ही योग्य वेळ नाही – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री
तर, पेट्रोल-डिझेलचे दर अद्याप कमी करता येणार नाहीत, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या अगोदरच स्पष्ट केले आहे.
“सरकारचे उत्पन्न बरेच कमी झाले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान उत्पन्न कमी राहिले आणि २०२१-२२ मध्येही कमी राहण्याची शक्यता आहे. सरकारचे उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे. त्यामुळे इंधन दर आता कमी करता येणार नाहीत” असं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलेलं आहे.
“पेट्रोल पंपावर गेल्यावर महागाईचा विकास दिसणार”; राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला
तर, इंधन दर वाढीवरून मोदी सरकारवर टीका करताना राहुल गांधी यांनी “काही राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. पेट्रोल पंपावर बिल घेताना मोदी सरकारने केलेला महागाईचा विकास दिसणार आहे. कर वसुली, महामारीच्या लाटा येत आहेत”, असं ट्वीट केलेलं आहे.