सीबीआय अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर सीबीआयच्या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानंतर आज पहाटेपासूनच सीबीआयने नवी दिल्लीतील त्यांच्याच मुख्यालयात छापे मारले आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आज केंद्र सरकारकडून या सर्व प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेतली. देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेतील सध्याची परिस्थिती विचित्र आणि दुर्दैवी आहे. याची चौकशी करण्याचे अधिकार सरकारकडे नाहीत, केवळ केंद्रीय दक्षता आयोग या प्रकरणी चौकशी करु शकतं. केंद्रीय दक्षता आयोगाला या चौकशीचे अधिकार असल्याने केंद्रीय दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसार एसआयटी सीबीआय अधिकाऱ्यांची चौकशी करेल. वादात अडकलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांपैकी कोणता अधिकारी योग्य किंवा अयोग्य हे मला माहित नाही, पण केंद्रीय दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसार एसआयटी योग्यपणे चौकशी करेल, अशी माहिती जेटली यांनी दिली. तसंच, राफेल प्रकरणातील चौकशीमुळे सीबीआय आणि त्यांच्या मोठ्या अधिकाऱ्यांना वादात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, म्हणूनच दोन्ही अधिकाऱ्यांना सुट्टीवर पाठवण्यात आलं, असा गंभीर आरोप विरोधकांकडून होत आहे. मात्र, विरोधकांचे आरोप पुर्णपणे बिनबुडाचे आहेत, दोन्ही अधिकारी पदावर असताना त्यांची चौकशी शक्य नव्हती, त्यामुळे त्यांना हटवलं. पण निर्दोष सिद्ध झाल्यानंतर ते पुन्हा पदभार सांभाळतील,  निष्पक्ष चौकशीसाठी त्यांना पदावरून दूर करणं गरजेचं होतं असं म्हणत जेटलींनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले.

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक व दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यातील हा वाद आहे. अस्थाना यांच्यावर तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआय एजन्सीचे पोलीस उपअधीक्षक (डीसीपी) देवेंद्र कुमार यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी अस्थाना यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तर अस्थाना यांनीही वर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वर्मा आणि अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यांच्याजागी सीबीआयचे संयुक्त संचालक नागेश्वर राव यांच्याकडे प्रभारी संचालकपदाची सूत्रे देण्यात आली आहेत.

Story img Loader