आमची अण्वस्त्रे देशाच्या संरक्षणासाठी असून ‘शब-ए-बारात’सारखे प्रसंग साजरे करण्यासाठी नाही, अशा शब्दात पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी गर्भित इशारा दिला असून, पाकिस्तानला अस्थिर करत असल्याचा आरोप भारतावर केला आहे.पाकिस्तानला अण्वस्त्रहीन करण्याच्या अंतिम उद्देशाने आणि एका पूर्वनियोजित धोरणाचा भाग म्हणून भारताने आक्रमक दृष्टिकोन ठेवला असल्याचा दावा १९९९ ते २००८ या कालावधीत पाकिस्तानमध्ये सत्तेवर असलेले मुशर्रफ यांनी केला. आम्हाला आमची अण्वस्त्रक्षमता वापरण्याची इच्छा नाही, परंतु आमचे अस्तित्व धोक्यात आले तर आम्ही ही अण्वस्त्रे कुणासाठी तयार केली आहेत? चौधरी शुजात यांच्या शैलीत सांगायचे तर आम्ही ती ‘शब-ए-बारात’च्या प्रसंगी वापरण्यासाठी साठवून ठेवली आहेत काय? आमच्यावर हल्ला करू नका आणि आमच्या क्षेत्रीय सार्वभौमत्वाला आव्हान देऊ नका, कारण आम्ही लहानसहान शक्ती नाही. आम्ही बडी आणि आण्विक शक्ती आहोत. आम्हाला भाग पाडू नका, असे मुशर्रफ यांनी ‘दुन्या न्यूज’शी बोलताना सांगितले.
पाकिस्तानला अण्वस्त्रहीन करण्याचे भारताचे स्वप्न प्रत्यक्षात येणे शक्य नाही, हा आत्मविश्वास आम्हाला असायला हवा. आम्ही त्यांचा खेळ पूर्ण होऊ देणार नाही, असे मुशर्रफ म्हणाले.सुमारे १२० क्षेपणास्त्रे असलेला पाकिस्तान जगात सर्वाधिक वेगाने अण्वस्त्र कार्यक्रम राबवणारा देश असून, २०२० सालापर्यंत त्याच्याजवळ २००हून अधिक आण्विक उपकरणे तयार करण्यासाठी पुरेसे विखंडनक्षम साहित्य राहील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दहशतवाद्यांना उखडून टाकण्यासाठी आपण सीमेपलीकडे जाण्यात अजिबात संकोच करणार नाही, असा सुप्त इशारा भारताने पाकिस्तानला उद्देशून दिला होता.

Story img Loader