पीटीआय, भूज
‘सीमांबाबत एका इंचाच्या भूमीचीही तडजोड भारत करणार नाही. देशाचे संरक्षण करण्यासाठी संरक्षण दले मजबूत आहेत. लोकांचा संरक्षण दलांवर विश्वास आहे’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. लडाखमध्ये भारत-चीन सैन्यमाघारी आणि गस्तीसंबंधी झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांबरोबर दिवाळी साजरी करतात. यंदा त्यांनी गुजरातमधील कच्छ येथील भारत-पाकिस्तान सीमेजवळील सर क्रीक येथील जवानांबरोबर दिवाळी साजरी केली. ‘देशाच्या संरक्षण दलांकडे शत्रू पाहतात, तेव्हा शत्रूच्या घातकी योजना संपुष्टात येतात’, असे सांगून मोदी म्हणाले, ‘देश सुरक्षित आहे, असे नागरिकांना तुमच्यामुळे वाटते.’ सीमा सुरक्षा दल, लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे जवान पंतप्रधानांच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते.
हेही वाचा : १९ भारतीय कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध, युक्रेनविरोधी युद्धात रशियाला मदत आरोप
मोदी म्हणाले, ‘देशात आज असे सरकार आहे, की जे एका इंचाच्या भूमीचीही तडजोड करणार नाही. सरकारचा संरक्षण दलांच्या मजबुतीवर विश्वास आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्याकडे आपण वेगवेगळे पाहतो. पण, जेव्हा ते एकत्र येतात, तेव्हा त्यांची शक्ती काही पटींनी वाढते. सीमांवरील पायाभूत सुविधा विकसित करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.’
शहरी नक्षलवाद्यांचा बीमोड आवश्यक
एकतानगर : ‘दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी देशात एकीचे बळ वाढवावे’, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी गुरुवारी केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयीतिनिमित्त त्यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे त्यांना आदरांजली वाहिली. ‘जंगलातील नक्षलवाद संपत असल्यामुळे शहरी नक्षलवाद्यांचे नवे प्रारूप तयार होत आहे. शहरी नक्षलवाद्यांना ओळखून त्यांना नेस्तनाबूत करण्याची गरज आहे’, असे मोदी म्हणाले. ‘देशात आणि देशाबाहेर अशा काही शक्ती आहेत, ज्यांना देशात अस्थिरता तयार करायची आहे. भारताच्या आर्थिक हितसंबंधांना धक्का पोहोचवायचा आहे. भारताच्या बाबतीत परकीय गुंतवणूकदारांना त्यांना चुकीचा संदेश द्यायचा आहे’, असे ते म्हणाले.
जंगलातील नक्षलवाद संपत असल्यामुळे शहरी नक्षलवाद्यांचे नवे प्रारूप तयार होत आहे. शहरी नक्षलवाद्यांना ओळखून त्यांना नेस्तनाबूत करण्याची गरज आहे. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान