जम्मू काश्मीरमधली सगळी परिस्थिती लक्षात घेत तिथे राज्यपाल राजवट आणावी अशी मागणी भाजपाने केली आहे. भाजपाचे प्रवक्ते राम माधव यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली, तसेच भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढल्याचेही स्पष्ट केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपा या दोघांनी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. मात्र आता भाजपाने तीन वर्षांनी या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताची सुरक्षा हा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. पीडीपी सोबत गेल्यावर सीमेवर दहशतवाद्याच्या कारवाया वाढल्या. मेहबुबा मुफ्ती या दहशतवादावर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्या म्हणूनच आम्ही या पक्षासोबत केलेली युती तोडतो आहोत आणि सत्तेतून बाहेर पडतो आहोत असे जाहीर करण्यात आले.

भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला आहे. सर्वसहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा नेत्यांनी दिली आहे. तीन वर्षांपूर्वी भाजपाने पीडीपीसोबत सरकार स्थापन केलं होतं. आज दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पीडीपीचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या मेहबुबा मुफ्ती संध्याकाळी राजीनामा देतील अशी माहिती आहे.

जम्मू काश्मीरचा विकास करण्यासाठी आम्ही पीडीपी सोबत गेलो. मात्र काश्मीर खोऱ्यात दहशतवाद, कट्टरता प्रचंड प्रमाणात वाढले. इथे राहणाऱ्यांना त्यांचे मुलभूत हक्कही बजावता येत नाहीत त्याचमुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असे भाजपाने म्हटले आहे.

Story img Loader