सुरूवातीपासून संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांच्या गूढ मृत्यूची चौकशी बुधवारी खास चौकशी पथकाने (एसआयटी)सुरु केली आहे. सुनंदा थरूर या काँग्रसचे खासदार शशी थरूर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर थरूर यांनी आपल्याला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. दरम्यान मी व माझ्या नोकराने सुनंदाला ठार केले असे कबूल करून घेण्यासाठी पोलिसांनी घरातील नोकर नारायण सिंग याला मारहाण केली व धमकावले असा आरोप माजी मंत्री शशी थरूर यांनी पोलिस प्रमुख बस्सी यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. हे पत्र गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच त्यांनी पाठवले होते.
दिल्लीचे पोलीस प्रमुख बी.एस.बस्सी यांनी सांगितले की, सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आम्ही एसआयटीची स्थापन केली आहे. पोलीस आयुक्तांनी खासदार थरूर यांचे जाबजबाब आवश्यक वाटल्यास घेतले जातील असे स्पष्ट केले आहे.
वर्षभराने खुनाचा गुन्हा का दाखल करण्यात आला, असे विचारले असता ते म्हणाले की, अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राने त्यांचा अंतिम अहवाल अलीकडे दिला. सुनंदा यांच्या व्हिसेराचे नमुने त्यानंतरच तपासणीसाठी परदेशात पाठवता येणार होते, त्यामुळे लगेच प्राथमिक माहिती अहवाल सादर करता आला नाही.
दिल्ली पोलिसांनी सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा वैद्यकीय अहवाल आला असून त्यात त्यांचा मृत्यू अनैसर्गिक व विषबाधेने झाला असल्याचे म्हटले आहे, पण अजूनही कुणावर संशय घेण्यात आलेला नाही. प्राथमिक माहिती अहवालात कुणाचेही नाव घेण्यात आलेले नाही. चौकशीकर्त्यांनी सांगितले की, सुनंदा यांच्या व्हिसेराचे नमुने हे ब्रिटन व अमेरिकेत पाठवले जाणार आहेत, कारण विष नेमके काय होते व ते कसे दिले गेले हे तपासण्याची सोय भारतात नाही. ते किरणोत्सारी समस्थानिकही असू शकते.
सूत्रांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी केरळ येथे तिरूअनंतपुरम येथील रूग्णालयास अलीकडे भेट दिली होती. दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडण्यापूर्वी त्यांच्यावर तेथे उपचार करण्यात आले होते. या पथकाने पुष्कर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना काही प्रश्न विचारले; त्यांना काही आजार होता किंवा काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वैद्यकीय नोंदी मागितल्या. विशेष चौकशी पथक हे थरूर व त्यांचे नातेवाईक, व्यक्तिगत कर्मचारी, पंचतारांकित हॉटेलचे कर्मचारी यांचे जाबजबाब घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्यावर्षी १७ जानेवारीला सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. हॉटेलच्या डॉक्टरांचे जबाबही घेतले जातील. हॉटेलच्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जाईल, सुनंदा यांच्या मोबाईल व लॅपटॉपचा न्यायवैद्यक अहवालही बघितला जाईल व त्याच्या चाचण्या केल्या जातील.
सुनंदा मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी
सुरूवातीपासून संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांच्या गूढ मृत्यूची चौकशी बुधवारी खास चौकशी पथकाने (एसआयटी)सुरु केली आहे.
First published on: 08-01-2015 at 04:41 IST
TOPICSसुनंदा पुष्कर
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We have formed an sit to probe the sunanda pushkar case says delhi police