आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीपुढे आम्ही ठेवलेले मुद्दे स्वीकारल्यास आम्ही दोघेही लगेचच राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा देण्यास तयार आहोत, असे पक्षाचे नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. आपण राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिला असल्याचे पक्षाच्या काही नेत्यांकडून सांगण्यात येत असलेली माहिती खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा टीका केल्यामुळे पक्षामध्ये निर्माण झालेली दरी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आपच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक शनिवारी होते आहे. त्या पार्श्वभूमीवर योगेंद्र यादव म्हणाले, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमंत्रकपदी कोण असावे, असा विषय आम्ही कधीच उपस्थित केला नव्हता. आम्ही केवळ पक्षामध्ये माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी केली जावी, राज्यातील पंचायत आणि महापालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीला घेऊ देण्यात यावा, कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी व्यवस्था केली जावी, यास्वरुपाचे पाच मुद्दे उपस्थित केले होते. मात्र, त्या मुद्द्यांवर काहीही न बोलता हा विषय वेगळ्या दिशेने नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतो आहे. केजरीवाल यांना निमंत्रक पदावरून हटविण्याची मागणी आपण कधीही केली नव्हती. आपच्या घटनेमध्येही एक व्यक्ती एक पद अशी कोणतीही तरतूद नसल्याचे त्यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये अनेक गुण असले तरी मी सांगेल तसेच झाले पाहिजे, असा त्यांचा हेकेखोरपणा पक्षासाठी घातक असल्याचे प्रशांत भूषण यांनी सांगितले. राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राजकीय व्यवहार समितीमध्ये स्वतंत्रपणे विचार करणाऱया व्यक्ती असल्या पाहिजेत, अशी आपली मागणी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader