इस्लामाबाद : पाकिस्तानातील सध्याच्या राजकीय परिस्थितीशी आपल्याला ‘मुळीच देणेघेणे नाही’, असे त्या देशातील शक्तिशाली अशा लष्कराने रविवारी सांगितले.
उपाध्यक्षांनी नाकारलेला अविश्वास ठराव आणि त्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्या सल्ल्यावरून अध्यक्ष आरिफ अलवी यांनी नॅशनल असेम्ब्ली भंग करणे अशा घडामोडी घडल्यानंतर, एका खासगी दूरचित्रवाहिनीशी बोलताना लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी हे वक्तव्य केले. ‘नॅशनल असेम्ब्लीत आज जे काही झाले, त्याच्याशी लष्कराला काही देणेघेणे नाही’, असे ते म्हणाले.
पाकिस्तानच्या अस्तित्वाच्या ७३ वर्षांच्या निम्म्याहून अधिक काळ शक्तिशाली अशा पाकी लष्कराने देशावर राज्य केले आहे. सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यांच्या बाबतीत त्याने बरेच सामर्थ्य मिळवले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी गेल्या आठवडय़ात किमान दोनदा पंतप्रधान खान यांची भेट घेतली होती. क्रिकेटमधील कारकीर्द गाजवल्यानतंर राजकारणात आलेले इम्रान खान यांनी पाकिस्तानी तेहरीक-इ-इन्साफ पक्षाची स्थापना करून पंतप्रधानपद मिळविले आहे.