दहशतवादी कारवायांसाठी पुरवला जाणारा निधी रोखतानाच इतर साधने नष्ट करण्यासाठी धोरण आखण्याची गरज आहे, असे मत भारत व अरब लीग यांच्या शिखर परिषदेत व्यक्त करण्यात आले. अरब-भारत सहकार्य मंचाची मंत्रीपातळीवरील पहिली बैठक येथे झाली. त्यावेळी दहशतवाद व धर्म यांचा संबंध जोडता कामा नये, असे आवाहन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केले.
त्यांनी सांगितले की, जे देश दहशतवादी गटांकडे आज मूक प्रेक्षक म्हणून बघत आहेत ती कृती एकप्रकारे दहशतवादाचा पुरस्कार करण्याचेच निदर्शक असून हेच दहशतवादी गट एक दिवस या देशांचा वापर करून घेतील असे त्यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका करताना सांगितले.
त्या म्हणाल्या की, आजची शिखर परिषद ही भारत-अरब देशातील संबंधांना ऐतिहासिक वळण देणारी असून दहशतवादी व अतिरेकी गट समाजाला अस्थिर करीत आहेत. आमच्या शहरांना, सामाजिक सुसंवादाला व लोकांना अतोनात नुकसान पोहचवित आहेत. दहशतवाद व धर्म यांचा संबंध जोडता कामा नये. दहशतवादी धर्माचा वापर करतात व सर्व श्रद्धांच्या लोकांना हानी पोहोचवतात, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.
भारत-बहारिन यांच्यात गुन्हेगार
हस्तांतराचा प्रत्यार्पण करार
भारत व बहारिन यांच्यात व्यापार व दहशतवाद विरोधी सहकार्यावर भर दिला जाणार आहे. शिक्षा झालेल्य गुन्हेगारांना एकमेकांच्या ताब्यात देण्याच्या प्रत्यार्पण करारावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व त्यांचे समपदस्थ खालीद बिन अहमद अल खलिफा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही नेत्यात विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली.

Story img Loader