राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे प्रतिपादन
देशाची विविधता, सहिष्णुता आणि विभिन्नता या मूलभूत मूल्यांचे रक्षण करण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दादरी हत्येच्या पाश्र्वभूमीवर केले.
विभिन्नता, बहुविधता, बंधुभाव ही देशाची वैशिष्टय़े आहेत. याची प्रत्येक नागरिकाने जाणीव ठेवणे आवश्यक आहे. राष्ट्र म्हणून भारताच्या ज्या मध्यवर्ती कल्पना आहेत आणि त्या घटनेत प्रतिबिंबित झाल्या आहेत. त्या प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले. विदेशी आक्रमणे, इंग्रजी राजवट, स्वातंत्र्योत्तर कालखंड या काळात भारतीय समाजावर विविध घडामोडींचा प्रभाव पडलेला असला तरी या देशाने एकात्मता, सहिष्णुता आणि बंधुभाव या तत्त्वांचे पालन केले आहे. कुठल्याही परिस्थितीत या तत्त्वांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दादरी येथील प्रकरणावरून देशातील वातावरण पेटले असून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींनी भाषण केले. या वेळी गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राष्ट्रपती हे भारतीय राष्ट्रवादाचे प्रतीक असल्याचे सांगितले. या वेळी अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. राष्ट्रपती म्हणाले की, देशातील राजकीय नेत्यांनी अशा वेळी परिस्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी भूमिका घेणे गरजेचे आहे. देशाने विविध क्षेत्रांत प्रगती केली असून अशा घटना सार्वभौमत्वास धक्का देणाऱ्या ठरतात.