आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक करू, असा इशारा हिमंता बिस्वा सर्मा यांनी दिला होता. त्यानंतर काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर याचा निषेध केला. राहुल गांधी यांना अटक करण्यासाठी लोकसभेची वाट का पाहता? असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला. खर्गे यांची पोस्ट शेअर करत सर्मा यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. “निवडणूक काळात आम्हाला राहुल गांधी हवे आहेत”, अशी नवी पोस्ट सर्मा यांनी केली आहे.

कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री प्रियांक खर्गे यांनी सर्मा यांच्या विधानाचा निषेध करताना म्हटले, “हिमंता बिस्वा सर्माजी लोकसभेपर्यंत वाट का पाहता आताच राहुल गांधी यांना अटक करा? जर राहुल गांधींनी जर कायदा मोडला असेल तर तुम्ही त्यांना आताच अटक का करत नाही? पण तुम्ही त्यांना अटक करणार नाहीत, कारण तुम्हालाही माहीत आहे, ते सत्य बोलतायत. तुम्ही तर तुमच्या शेजारी असलेल्या मणिपूरसाठीही उभे राहिला नाहीत आणि आसामच्या जनतेला लुटत आहात. राहुल गांधी जनतेची बाजू मांडत आहेत आणि जनताही त्यांना पाठिंबा देत आहेत. त्यावरून तुम्ही घाबरला आहात.”

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मंगळवारी गुवाहाटीत प्रवेश नाकारण्यात आला होता. शहरात वाहतुकीची कोंडी होईल, असे कारण देत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मांनी परवानगी नाकारली. पण, काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुवाहाटीत पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी कट रचणे, सार्वजनिक कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर सभा यासह विविध कलमांखाली राहुल गांधी, जितेंद्र सिंह, के.सी वेणुगोपाल, जयराम रमेश, श्रीनिवास बीव्ही, कन्हैया कुमार, गौरव गोगोई यांच्यासह अन्य काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणावर बोलत असताना हिमंता बिस्वा सर्मा म्हणाले, “एफआयआरच्या व्यतिरिक्त विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यांची चौकशी आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांना (राहुल गांधी) अटक करण्यात येईल.” विशेष म्हणजे, आसाम पोलिसांनी हा खटला आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला आहे.

भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि राहुल गांधी यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि आसाम पोलिस यांच्यात ठिकठिकाणी संघर्ष पाहायला मिळाला. यानंतर गुवाहटीच्या बाहेर सभेला संबोधित करत असताना राहुल गांधी कार्यकर्ते आणि समर्थकांना ‘बब्बर शेर’ (सिंह) म्हणाले. आसामच्या पोलिसांच्या बॅरिकेड्सला आम्ही घाबरत नाहीत, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. तसेच आम्ही कोणताही कायदा मोडत नाही, असेही सांगितले.

Story img Loader