जम्मू व काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांना स्थानबद्ध केल्यानंतर पाकिस्तानात काश्मीर मुक्त करण्याचे नारे दिले जात असून पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांच्या साथीने काश्मीरसाठी ‘जिहाद’ पुकारल्याची घोषणा मुंबईवरील हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि लष्कर ए तोयबाचा संस्थापक  व जमात उद दवाचा म्होरक्या हाफिज सईद याने शनिवारी केली आहे. स्वातंत्र्यासाठीचे हे आंदोलन येत्या काही आठवडय़ांत इतके तीव्र होईल की भारताला काश्मीर सोडून द्यावे लागेल, अशी दर्पोक्तीही त्याने केली. ‘जिहाद’ हे प्रत्येक इस्लामी राष्ट्राचे कर्तव्य आहे. पाकिस्तान सरकार व लष्कराने काश्मिरी जनतेला नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या जिहादमध्ये ते उतरतीलच, असेही तो म्हणाला.
गोळीबारात तरुण ठार
श्रीनगर : त्राल येथील कारवाईत दोन तरुण ठार झाल्याच्या निषेधात शनिवारी हुरियत कॉन्फरन्सने केलेल्या निदर्शनांदरम्यान शनिवारी एक तरुण मृत्युमुखी पडला. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला की निदर्शनादरम्यान चेंगराचेंगरीत, हे उघड झाले नसले तरी याप्रकरणी दोन जवानांना अटकही करण्यात आली आहे.
काश्मीर भारताचाच – ओवेसी
औरंगाबाद : जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठामपणे सांगतानाच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल ‘लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत भाजपवर जोरदार टीका केली.

Story img Loader