आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानपदाची महत्वकांक्षा न बाळगणाऱ्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) प्रमुख सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि मी एकत्र येण्यास तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. देश पिंजून काढून भारतीय जनता पार्टीला शह देण्यासाठी विरोधकांना एकत्र आणून जनतेला आत्मविश्वास देण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी राज्यात प्रथमच राष्ट्रवादी-काँग्रेस युतीचे दरवाजे मायावतींच्या बहुजन समाज पार्टीसाठीही खुले केले आहेत. अद्याप बसपा प्रमुख मायावतींशी याबाबत चर्चा झालेली नसली तरी त्या यासाठी नक्कीच खुश होतील असेही शरद पवार यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
या मुलाखतीत पवार यांनी २०१९च्या निवडुकांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर भाष्य केले. त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीला १९७५-७७ सारखी स्थिती असल्याचे संबोधले आहे. त्यावेळी इंदिरा गांधींना पर्याय नसल्याचा भ्रम निर्माण झाला होता, तशीच स्थिती आता नरेंद्र मोदींबाबत झाली आहे. त्यावेळी इंदिराजींनी माध्यमांसह सरकार आणि सरकारी संस्थांवर नियंत्रण मिळवले होते. तशीच मोदींची स्थिती आहे.
त्याचबरोबर विरोधकांनी राष्ट्रीय युतीपेक्षा राज्यांतील युती निर्माण करण्यावर भर द्यायला हवा असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर काँग्रेसने राज्यांमधील युतींसाठी तर्कसंगत दृष्टीकोन ठेवायला हवा. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून काँग्रेसच्या विचारांमध्ये निश्चित सुधारणा होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.