अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या ॲना सेबास्टियन पेरायिल (वय २६) या सनदी लेखाकार (सीए) तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेनंतर आता खासगी क्षेत्रातील कामाचा ताण आणि कामाच्या ठिकाणचे वातावरण याविषयावरील चर्चांना उधाण आलं आहे. समाज माध्यमावर अनेकजण व्यक्त होत आहेत. विविध कंपन्यांतील माजी कर्मचारीही त्यांच्यावरील कामाचा ताण आणि अनुभवाबाबत बोलू लागले आहेत.

यासंदर्भात जयेश जैन नावाच्या एका युजर्सने एक्स या समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्याने त्याच्या एका सहकाऱ्याबरोबरचे व्हॉट्सअॅप चॅटदेखील शेअर केले आहेत. या चॅटमध्ये तो त्यांच्या सहकाऱ्याबरोबर कामाचे तास आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी बोलताना दिसून येत आहे. अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) कंपनीतील तरुणीच्या मृत्यूच्या घटनेनंतर मला माझाही वैयक्तिक अनुभव शेअर करायचा आहे, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा – ‘ईवाय’मधील ‘सीए’ तरुणीच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पुढे बोलताना, खासगी कंपनीत काम करताना मी सुद्धा २० तास काम करायचो. त्यामुळे ॲना सेबास्टियन पेरायिल या तरुणीला काय त्रास झाला असेल, याची मला पूर्ण कल्पना आहे, असंही तो म्हणाला. तसेच कंपन्यांसाठी तुम्ही फक्त एक कर्मचारी आहात, पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही सर्वकाही आहात, त्यामुळे काळजी घ्या, खासगी क्षेत्रात काम करणं कठीण आहे, मी यातून वेळेत बाहेर पडलो, याचं समाधान आहे, असेही त्याने सांगितलं.

याशिवाय रोमा नावाच्या अन्य एका युजरने लिहिलं की, मी काही वर्षांपूर्वी जेव्हा एका खासगी कंपनीत काम करत होते, तेव्हा तेथील टीम लीडर माझा आणि इतर काही तरुणींना छळण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही त्याला विरोध केला, तर आम्हाला अतिरिक्त काम द्यायचा, त्यामुळे माझ्याकडे एकतर कंपनीला पैसे देऊन नोकरी सोडणे किंवा त्याचा त्रास सहन करणे, हे दोन पर्याय उरले होते.

अन्य एक युजर म्हणाला, ॲना सेबास्टियन पेरायिल या तरुणीच्या मृत्यूनंतर मला नारायण मूर्ती यांच्या ७० तास काम करण्याची सूचना आठवली. यावरून भारतीय कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकांची मानसिकता काय आहे? हे लक्षात येईल. या लोकांना कमर्चारी नाही, तर काम करणारे गुलाम हवे आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया त्याने दिली.

हेही वाचा – पुणे : सीए तरुणीच्या मृत्यूवर ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी मौन सोडून म्हणाले की,…

याशिवाय अन्य एकाने सांगितलं की एका खासगी कंपनीतील त्याच्या एका सहकाऱ्याचा कामाच्या तणावामुळे तसेच व्यवस्थित झोप ना झाल्याने डेस्कवरच मृत्यू झाला. तो केवळ २० वर्षांचा होता. त्यामुळे ॲना सेबास्टियन पेरायिल ही एकमेव घटना नाही, अशा अनेक घटना घडल्या आहेत.