काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत चर्चेला जोर धरू लागला असताना केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी लोकसभा निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढविण्याची आमची इच्छा असल्याचे म्हटले.
राहुल गांधींनीही पक्ष देईल ती जबाबदारी निभावण्यास तयार असल्याचे वक्तव्य केल्याने पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनिष तिवारी म्हणाले की, राहुल गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधानपदासाठी प्रबळ आणि सर्वमान्य नेते असल्याचे आम्ही याआधीपासूनच सांगत आलो आहे. तसेच त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्हाला आगामी लोकसभा निवडणुका लढविण्याची इच्छा आहे. परंतु, पक्षाचे अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची आहे. त्यांनी घेतलेला निर्णय सर्वमान्य असेल असेही मनिष तिवारी म्हणाले.
येत्या शुक्रवारी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्ष जो काही आदेश देईल, तो पाळण्यास मी तयार आहे. पक्ष जे काही काम मला सांगेल, ते पार पाडण्यासाठी मी सज्ज आहे. आमच्या पक्षामध्ये ज्येष्ठ नेतेच सर्व निर्णय़ घेत असतात. याआधीही काही निर्णय घेण्यात आले होते. सत्ता विष आहे, असे जरी मी म्हटले असले, तरी त्याचा अर्थ असा नाही की मी कोणतीही जबाबदारी घेण्यास उत्सुक नाही. असे  राहुल गांधी एका वृत्तपक्षाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. त्यामुळे ते पंतप्रधान पदासाठी सकारात्मक असल्याचे निदर्शनास आले आहे. 

Story img Loader