सुप्रीम कोर्टाने मशीदीमध्ये नमाज पठण हे इस्लाममध्ये अनिवार्य नसल्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयाला कायम ठेवले. या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले असून लवकरच या खटल्यावर अंतिम निर्णय येईल अशी आशाही संघाकडून व्यक्त करण्यात आली आहे.


रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुणकुमार यांनी सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, आज सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमीवरील खटल्यावर तीन सदस्यीय खंडपीठाद्वारे २९ ऑक्टोबरला सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. याचे आम्ही स्वागत करतो. तसेच लवकरात लवकर या खटल्यावर न्याय देणारा निर्णय येईल अशी आम्ही आशा करतो.

सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय मुस्लिम पक्षकारांसाठी झटका मानला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या यापूर्वीचा निर्णय घटनापीठाकडे पाठवण्याची त्यांची मागणी अमान्य करण्यात आली. या निर्णयानंतर आता २९ ऑक्टोबरपासून अयोध्या वादप्रकरणाचा खटल्याची सुनावणी सुरु होणार आहे. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

दरम्यान, आज सुप्रीम कोर्टाने मशिदींबाबत निर्णय दिल्यानंतर राजकीय प्रतिक्रियांना सुरुवात झाली आहे. यावर भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, या निर्णयामुळे राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुलभूत अधिकारांचा विजय झाला आहे. मशिदीला बाजूला उभारले जाऊ शकते, मंदिराला नाही. त्यामुळे या मार्गातील अडथळा दूर झाला असून आता राम मंदिराची उभारणी होईलच. तर दुसरीकडे बाबरी मशीद प्रकरणाचे पक्षकार इकबाल अन्सारींनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर म्हटले की, हा निकाल मंदिर-मशीद यावर नव्हता. मुस्लिमांवर या निर्णयामुळे कोणताही परिणाम होणार नाही.

Story img Loader