119 illegal Indian immigrants lands in Amritsar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचा दौरा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा अवैध स्थलांतरितांची पाठवणी सुरू झाली आहे. पहिले विमान ५ फेब्रुवारी रोजी आले होते. त्यानंतर १५ फेब्रुवारी, शनिवारी रात्री स्थलांतरितांना घेऊन येणारे दुसरे विमान अमृतसर विमानतळावर उतरले. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर स्थलांतरितांना लष्करी विमान घेऊन येणार की प्रवासी विमानातून आणले जाणार? त्यांच्या हाता-पायात बेड्या घातल्या जाणार का? असे प्रश्न निर्माण झाले होते. मात्र दुसऱ्या फेरीतूनही लष्करी विमानातून प्रवाशांना बेड्या घालून आणले गेल्याचा आरोप होत आहे.

शनिवारी रात्री ११९ भारतीयांना घेऊन अमरिकेन लष्कराचे सी १७ ग्लोबमास्ट्र थर्ड हे विमान अमृतसर विमानतळावर उतरले. ११९ पैकी ६७ प्रवाशी एकट्या पंजाबमधील आहेत. तर हरियाणामधील ३३ जण आहेत. गुजरात ८, उत्तर प्रदेश ३, गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील प्रत्येकी दोन आणि हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एक प्रवाशी आहे. १९९ जणांमध्ये चार महिला, दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. बहुसंख्या स्थलांतरित हे १८ ते ३० वयोगटातील आहेत.

दरम्यान दुसऱ्या विमानातून आणलेल्या स्थलांतरितांनाही बेड्या घातल्याचे समोर आले आहे. दलजीत सिंग यांनी होशियारपूरमध्ये पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले, “आमच्या हातात बेड्या आणि पायाला साखळ्या बांधल्या होत्या. आम्ही डंकी मार्गावरून अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश केला होता.” दलजित सिंग यांच्या पत्नीने आरोप केला, एजंटने थेट अमेरिकेत नेण्याचे वचन देऊन आमची फसवणूक केली.

दरम्यान फिरोजपूर येथे राहणाऱ्या सौरव नामक युवकालाही दुसऱ्या विमानातून परत धाडण्यात आले आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना सौरवने त्याच्यावर बेतलेला प्रसंग केथन केला. “२७ जानेवारी रोजी मी अमेरिकेत प्रवेश केला होता. सीमा ओलांडताच दोन-तीन तासातच आम्हाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आम्हाला निर्वासितांच्या शिबिरात नेण्यात आले. आम्ही १५ ते १८ दिवस शिबिरात राहिलो. तिथे आमचे कुणीही ऐकून घेत नव्हते. दोन दिवसांपूर्वी आम्हाला दुसऱ्या शिबिरात नेले जाणार असल्याचे सांगण्यात आले. जेव्हा आम्ही विमानतळावर उतरलो, तेव्हा समजले की त्यांनी आम्हाला परत भारतात पाठवले आहे”, अशी माहिती सौरवने दिली.

सौरव पुढे म्हणाला, “मी जवळपास ४५ लाख रुपये खर्च करून अमेरिकेत शिरण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या पालकांनी जमीन विकून पैसे गोळा केले होते. १७ डिसेंबर रोजी मी भारतातून निघालो होतो. मला आधी मलेशिया नेले गेले. तिथे आठवडाभर राहिल्यानंतर पुन्हा मुंबईत आलो. मुंबईत १० दिवस राहिल्यानंतर ॲमस्टरडॅमला विमानाने गेलो. मग पनामा, मेक्सिको असा प्रवास केला. मेक्सिकोमधून दोन ते तीन दिवस पायी वाटचाल करून मी अमेरिकेत पोहोचलो होतो. आता माझी सर्व स्वप्न धुळीस मिळाली असून आमचे पैसेही गेले आहेत.”

Story img Loader