US deportee Turbans story: अमेरिकेत अवैधपणे प्रवेश केलेल्या इतर देशांतील नागरिकांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठविण्याची मोहीम राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केल्यानंतर शनिवारी आणि रविवारी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे विमान भारतीय नागरिकांना घेऊन आले. ५ फेब्रुवारी रोजी पहिल्या विमानातून १०४, दुसऱ्या विमानातून ११९ आणि तिसऱ्या विमानातून ११२ भारतीय नागरिकांना अमेरिकेतून पुन्हा पाठिवण्यात आले आहे. भारतात परतल्यानंतर अनेकांनी त्यांच्या खडतर प्रवासाबाबतची कहाणी सांगितली. विमानात बेड्या आणि पायाला साखळ्या बांधण्याचा प्रकार याआधी समोर आला होताच. आता शीख बांधवांना त्यांच्या डोक्यावरील पगडी उतरविण्यास सांगितल्याचा प्रकारही समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी दुसऱ्या विमानातून २१ वर्षीय जसविंदर सिंग भारतात परतला. मोगा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या जसविंदरने कुटुंबाची दीड एकर जमीन आणि दोन खोल्यांचे घर गहाण ठेवून अमेरिकेला जाण्याची रक्कम गोळा केली होती. एवढेच नाही तर एजंटला ४४ लाख रुपये देण्यासाठी त्यांनी त्यांच्या म्हशीही विकल्या. २७ जानेवारी रोजी जसविंदरने मेक्सिको सीमेमधून अमेरिकेत प्रवेश केला आणि काही मिनिटांतच त्याला अटक झाली. तेव्हापासून अमेरिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला त्याच्या डोक्यावरील पगडी काढायला लावली होती. १५ फेब्रुवारी रोजी तो पुन्हा अमृतसर विमानतळावर उतरल्यावरच त्याने डोक्याला फडका गुंडाळला.

द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना जसविंदरने त्याच्याबरोबर घडलेल्या प्रसंगाची उजळणी केली. “२७ जानेवारी रोजी मला अटक झाल्यानंतर डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आले. तिथे गेल्यावर मला सर्व कपडे काढण्याची सूचना केली. डोक्यावरील पगडीही त्यांनी ठेवली नाही. आम्हाला फक्त टीशर्ट, ट्रॅक पँट, मोजे आणि बुट घालण्याची परवागनी होती. बुटाच्या लेसही त्यांनी काढून घेतल्या होत्या. मी आणि इतर शीख बांधवांनी सुरक्षा रक्षकांना विनंती केली की, आम्हाला आमची पगडी पुन्हा द्या. पण त्यांनी नकार दिला. सुरक्षा रक्षक म्हणाले की, या पगडीने तुमच्यापैकी कुणी गळफास लावून घेतला तर त्याल जबाबदार कोण? डिटेन्शन सेंटरमध्ये आम्ही जेवढे दिवस होतो, तेवढे दिवस आम्हाला पगडी घालून दिली नाही. अमृतसर विमानतळावर उतरल्यावर मी रुमालाने माझे डोके झाकले”, अशी व्यथा जसविंदरने सांगितली.

कुटुंबाला मदत व्हावी म्हणून अमेरिकेला गेलो

जसविंदर पुढे म्हणाला, “माझ्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो. माझे वडील हृदयरोगी आहेत, ते काम करू शकत नाहीत. आता माझ्यावर ४४ लाखांचे कर्ज झाले आहे. हे कर्ज कसे फेडायचे? आम्ही तर आमचे घरही गहाण ठेवले आहे.” जसविंदरचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये त्याने अमेरिकेला जाण्यासाठी घर सोडले. आधी तो दिल्लीहून प्राग, चेक रिपब्लिकला गेला. तिथून मग स्पेन, एल साल्वाडोर, ग्वाटेमाला आणि मेक्सिको असा प्रवास करत यूएस-मेक्सिको सीमेवर पोहोचला.

“मी २६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या सीमेजवळ पोहोचलो. पण जोरदार पाऊस असल्यामुळे माझ्या एजंटने २७ जानेवारी रोजी सीमा ओलांडू दिली. काही मिनिटांतच सुरक्षा रक्षकांनी मला पकडले. जरी मला अटक झाली तरी डिटेन्शन सेंटरमधून काही दिवसांत माझा जामीन होईल, असे आश्वासन माझ्या एजंटने दिले होते. पण त्याने मला फसवले. आता मला माझे पैसे परत हवेत. पंजाब सरकारने पैसे परत मिळवून देण्यात माझी मदत करावी”, असे आर्जवही जसविंदर सिंगने केले आहे.