Bihar Floor Test Tejashwi Yadav Speech : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले असताना इंडिया आघाडीला सोडून पुन्हा एकदा एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज बिहार विधानसभेत त्यांनी बहुमत सिद्ध केले. यावेळी विश्वासदर्शक ठरावावेळी भाषण करत असताना लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी विश्वासदर्शक ठराव नितीश कुमार सरकारने १२९ मतांनी जिंकला. विरोधकांनी मतदानावर बहिष्कार टाकत सभात्याग केला होता.
तुमचे मन लागत नव्हते तर आम्ही काय नाचू का?
तेजस्वी यादव म्हणाले की, नितीश कुमारजी तुम्ही आम्हाला न सांगताच राज्यपालांकडे गेलात. निदान यावेळी सांगून तरी जायचे होते. तुमच्यासाठी आम्ही सरकारमधून बाहेर पडलो असतो आणि तुम्हाला बाहेरून पाठिंबा दिला असता. आम्हाला सत्ता मिळाली नसती तरी चालले असते. पण तुम्ही राजभवनाच्या बाहेर येऊन सांगितले की, तुमचे सरकारमध्ये मन रमत नव्हते. मग तुमचे मन रमण्यासाठी आम्ही काय नाच-गाणं करायला हवं होतं का? असा सवाल तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला.
नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार नाहीत, ही मोदी गॅरंटी आहे का? तेजस्वी यादव यांची टीका
तेजस्वी यादव यांनी आपल्या भाषणात नितीश कुमार यांच्या यु-टर्नबद्दल टोकदार भाष्य केलं. २०१७ पासून नितीश कुमार यांनी दोन वेळा भाजपा आणि दोन वेळा आरजेडीला सोडलं. २०२० साली भाजपावर नितीश कुमार यांनी आरोप केला होता की, भाजपा त्यांच्या पक्षाला फोडण्याचा प्रयत्न करत आहे. “आता मी मरण पत्करेन पण पुन्हा भाजपाबरोबर जाणार नाही. मी आता भाजपाला हद्दपार करण्यासाठी आरजेडीशी आघाडी करत आहे”, असं तुम्ही म्हणाला होता. मग पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर कसे गेलात? असा प्रश्न तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला.
मोठी बातमी! नितीश कुमार आणि भाजपानं बहुमत सिद्ध केलं, तेजस्वी यादव यांना झटका
मला तर जदयूच्या आमदारांची काळजी वाटते
आम्ही तर आता सरकारमधून बाहेर पडलो आहोत. आता आम्ही जनतेमध्ये जाऊन काम करू. त्यांना मागच्या १७ महिन्यात आम्ही काय करू शकलो, याची माहिती देऊ. पण मला काळजी वाटते जनता दल युनायटेडच्या आमदारांची. ते जनतेमध्ये जाऊन काय सांगणार? नितीश कुमार तर इथून तिथून उड्या मारतात. पण जनतेला तर आमदारच तोंड देणार आहेत ना. नितीश कुमार यांनी तीन-तीन वेळा शपथ घेतली, हे जनता विचारेल, तेव्हा काय सांगणार? असा खोचक प्रश्न तेजस्वी यादव यांनी विचारला.