केंद्र सरकारने काँग्रेसच्या कार्यकाळातील राज्यपालांना राजीनामा देण्यास सांगितल्याच्या मुद्द्यावरून सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. मात्र, आम्ही राज्यघटनेतील नियमांचे पालन करत आहोत, तेव्हा संबंधित राज्यपालांनीच स्वत:च्या  सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा, असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. या मुद्द्यावरून राजकारण करण्याची गरज नाही. जेव्हा २००४ साली युपीए सरकार सत्तेत आले तेव्हा, कोणतीही पूर्वसुचना न देता भाजपनियुक्त राज्यपालांना पदावरून दूर केले गेले. तोच काँग्रेस पक्ष आता, २०१४मध्ये अशाप्रकारे राज्यपालांना पदावरून दूर करणे अयोग्य असल्याचा कांगावा करत आहे. एनडीए सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांना २००४मध्ये पदावरून दूर केल्याची घोषणा ही कोणतीही पूर्वकल्पना न देता एका पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती अशी आठवण प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसला करून दिली. तेव्हा, आता केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्यच असून, या निर्णयामुळे देशाच्या घटनेचे कोणतेही उल्लंघन होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader