नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) राष्ट्रीय अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा असं काही वक्तव्य केलं आहे की ते चर्चेत आलेत. हरदोईमध्ये कार्यकर्ता सम्मेलनाला संबोधित करताना सुभासपाचे प्रमुख असणाऱ्या राजभर यांनी जर उत्तर प्रदेशमध्ये पक्षाचं सरकार आलं तर ते वेगवेगळ्या जातीच्या नेत्यांना संधी देण्यात येईल आणि पाच वर्षात पाच मुख्यमंत्री आणि दर वर्षाला चार नवे उपमुख्यमंत्री बनवले जातील, असं म्हटलं आहे. म्हणजेच राजभर यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या पक्षाचं सरकार आल्यास पाच वर्षात उत्तर प्रदेशला पाच मुख्यमंत्री आणि २० उपमुख्यमंत्री मिळतील.

ओम प्रकाश राजभर यांनी आपल्या भाषणामधून भाजपावर हल्लाबोल केला. इतकच नाही तर त्यांनी निषाद पक्षाचे संजय निषाद यांच्या मुलावरही टीका केली. तुम्ही भाजपाकडे भीक का मागत आहात. त्याऐवजी तुम्ही आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, असं राजभर यांनी संजय निषाद यांच्या मुलावर टीका करताना म्हटलं आहे. तसेच आता भाजपाला मत देणारं कोणी शिल्लक राहीलं नसून सुभासपाचे सरकार बननण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही, असा विश्वासही राजभर यांनी व्यक्त केला.

राजभर हे हरदोईमधील अतरौली क्षेत्रामध्ये सुभासपाच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला हजर होते. भाजपावर टीका करताना राजभर यांनी, उत्तर प्रदेशची जनता आता भाजपाला कंटाळली आहे. सध्या भाजपाला कोणी मतं देत नाही. याचा परिणाम लवकरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहायला मिळाले, असं म्हटलं आहे. राजभर यांनी निषाद पार्टीचे प्रमुख असणाऱ्या संजय निषाद यांच्यावरही शेलक्या शब्दांमध्ये टीका करत भाजपासोबत जाण्यासाठी ते एवढे लाचार का झालेत असा प्रश्न उपस्थित केला. भाजपाच्या मागे मागे जाण्याऐवजी निषाद पक्षाने आमच्यासोबत यावं असं राजभर म्हणालेत. या बैठकीसाठी सुभासपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव यादव, प्रदेश महासचिव राममूर्ती अर्कवंशी, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र अर्कवंशी यांनीही उपस्थिती लावली होती.

उत्तर प्रदेशमध्ये काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरांवरील पक्षासोबतच राज्य स्तरावरील पक्षांनीही तयारीला सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे.

Story img Loader