आणीबाणीचे निमित्त करत भाजपाने काँग्रेसवर तिखट शब्दांत टीका केली आहे. केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी आणीबाणीवरून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हुकूमशाह हिटलरशी तुलना केली. तर दुसरीकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आणीबाणीविषयक धडा अभ्यासक्रमात समावेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. येणाऱ्या पिढीला आणीबाणीचा काळा इतिहास माहीत होणे जरूरीचे असल्यामुळे अभ्यासक्रमात याचा समावेश करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जावडेकर म्हणाले की, आमच्या अभ्यासक्रमात आणीबाणीविषयक धडे आणि संदर्भांचा समावेश आहे. पण आणीबाणीने लोकशाहीला कसे प्रभावित केले होते, याचा आता आम्ही अभ्यासक्रमात समावेश करणार आहोत. यामुळे येणाऱ्या पिढीला याबाबत आणखी माहिती होईल. तत्पूर्वी अरूण जेटली यांनी फेसबुक पोस्टमध्ये इंदिरा गांधी यांची हिटलरशी तुलना केली होती. या दोघांनी घटना पायदळी तुडवली होती, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ च्या मध्यरात्री देशात आणीबाणी लागू केली होती. ही आणीबाणी २१ मार्च १९७७ पर्यंत लागू होती. यादरम्यान तमाम विरोधी पक्षाच्या नेत्यांना कारागृहात डांबण्यात आले होते. माध्यमांचे स्वातंत्र्य नाकारण्यात आले होते. नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणण्यात आली होती. आणीबाणी ही भारतीय लोकशाहीतील काळा डाग असल्याचे मानले जाते. तिसऱ्यांदा देशात आणीबाणी लागू झाली होती. यापूर्वी १९६२ मध्ये भारत-चीन युद्धावेळी आणि १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धावेळी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. पण १९७५ मध्ये पहिल्यांदा आणि शेवटी अंतर्गत हालचालींचा हवाला देत आणीबाणी थोपवण्यात आली होती.