काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भारतीय जनता पार्टी, जनता दल सेक्युलर (जीडी-एस) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे. सिद्धरामय्या म्हणाले की, “भाजपा आणि जेडीएस या पक्षांकडे कोणतीही विचारसरणी नाही. या लोकांनी (भाजपा) मला राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जरी बनवलं तरी मी त्यांच्यासोबत जाणार नाही. माझा मृतदेहसुद्धा त्यांच्यासोबत जाणार नाही.”
सिद्धरामय्या म्हणाले की, “जनता दल (सेक्युलर) आणि इतर पक्ष सत्तेसाठी भाजपसोबत जातील. त्यांच्याकडे (जेडी-एस) कोणतीही विचारसरणी नाही, तसेच त्यांच्याकडे कोणतीही तर्कशुद्धता नाही. सत्तेसाठी हे पक्ष कोणासोबतही हातमिळवणी करू शकतात.”
सिद्धरामय्या सोमवारी कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमात म्हणाले की, “भाजपाने आरोप केला आहे की, मी हिंदू विरोधी आहे. भाजपाचे सी. टी. रवी मला सिद्धारमुल्ला खान म्हणतात. महात्मा गांधी सच्चे हिंदू होते. हे लोक कसले हिंदू आहेत जे गोडसेची पूजा करतात. ज्या गोडसेने गांधींजींची हत्या केली तो गोडसे म्हणजे यांची प्रतिष्ठा आहे.”
भाजप सरकार अपयशी
सिद्धरामय्या यांनी ते कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांबद्दल बोलताना सांगितलं की, मी सर्वांना अन्न सुरक्षा प्रदान केली. परंतु हेच काम करण्यात भारतीय जनता पार्टी अपयशी ठरली. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सर्व गरिबांसांठी अन्नभाग्य योजना आणली होती. बसवेश्वर यांच्या जयंतीच्या दिवशी शपथ घेतली होती आणि त्यानंतर एका तासात अन्नधान्य, शेती आणि दुग्धव्यवसायाला सुरक्षितता प्रदान केली. आम्ही सर्वांचे कर्ज माफ केले.
हे ही वाचा >> “…असं सांगणं बकवास आहे”, शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल; नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख!
“आम्ही ७ किलो तांदूळ मोफत दिलं”
सिद्धरामय्या म्हणाले की, “आम्ही प्रत्येकाला ७ किलो तांदूळ मोफत दिलं होतं. परंतु आता भाजपाने तेच ५ किलो केलं आहे. परंतु आम्ही आगामी काळात १० किलो तांदूळ देऊ. आम्ही राज्यातल्या प्रत्येक गृहिणीला दर महिन्याला २,००० रुपये देऊ. याशिवाय दर वर्षी २४,००० रुपये देण्याची योजना देखील आणणार आहोत.”