भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचे जवळपास निश्चित असून, येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे बिहारचे कृषिमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप आणि संयुक्त जनता दलातील भविष्यातील संबंधांवर भाष्य केले.
नरेंद्र सिंह म्हणाले, कलंकित व्यक्तीच्या हाती भाजपने निवडणुकीचे नेतृत्त्व दिले आहे. त्यांना केवळ धार्मिक राजकारण करायची इच्छा आहे. मात्र, जनता दल ते कधीच सहन करणार नाही. आम्ही त्यांच्यापासून वेगळं होऊन स्वतत्रपणे आमच्या मार्गावर चालण्याच्या तयारीत आहोत. लवकरच यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सध्या सेवा यात्रेवर असल्यामुळे १४ जूननंतर संयुक्त जनता दलाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात येणार असून, त्यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. मोदींचे नाव पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची केवळ औपचारिकता शिल्लक असल्यामुळे संयुक्त जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडणार हे निश्चित आहे. नितीशकुमार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद यादव आणि इतर नेत्यांसोबत यासंदर्भात एकदा चर्चा केलेलीच आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली.