अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत दृढ निश्चयाने उभे राहण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. दशतदवादाला आपण जिंकू देणार नाही असे त्यांनी ट्विटद्वारे जाहीररित्या सांगितले आहे. त्याचबरोबर, अमेरिकेकडून मुंबई हल्ल्याच्या सुत्रधारांना पकडून देणाऱ्यांना ५० लाख डॉलर (३५ कोटी) रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.


यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या दशपूर्तीनिमित्त न्यायासाठी अमेरिका भारतीयांसोबत आहे. या हल्ल्यामध्ये ६ अमेरिकन नागरिकांसोबत १६६ निर्दोष लोकांचे प्राण गेले होते. आम्ही कधीही दहशतवादाला जिंकू किंवा जिंकण्याच्या जवळ जाऊ देणार नाही.

तत्पूर्वी, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही यातील दोषींवर कारवाई न होणे हा पीडितांचा अपमान आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार या हल्ल्याचे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे हे पाकिस्तानची जबाबदारी आहे, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी केली होती. तसेच या दोघांना पकडण्यासाठीच्या बक्षिसातही अमेरिकेकडून वाढ करुन ती ५० लाख डॉलर्स अर्थात ३५ कोटी रुपये इतकी करण्यात आल्याचे जाहीर केले होते.

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते. या हल्ल्याला आज १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी अमेरिकेच्यावतीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मुंबई हल्ल्याच्या दशवर्षपूर्तीनिमित्त मी अमेरिका तसेच सर्व अमेरिकन नागरिकांच्यावतीने मुंबईकरांना बळ मिळावे अशी भावना व्यक्त करतो, असे पोम्पिओ म्हणाले होते.