अयोध्येत रामलल्ला विराजमान होणार आहेत. २२ जानेवारीला हा सोहळा रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. मात्र या कार्यक्रमावर चारही पीठाच्या शंकराचार्यांनी बहिष्कार घातला आहे. याबाबत ब्रदीनाथ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी याविषयी मतप्रदर्शन केलं आहे. आम्हाला राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण नाही. ते आलं तरीही आम्ही जाणारन नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती काय म्हणाले?
“आम्ही कुठल्याही आमंत्रणाला नकार दिलेला नाही. कारण वस्तुस्तिथी ही आहे की आम्हाला अजून आमंत्रणच मिळालेलं नाही. त्यामुळे आमच्यावर हा आरोप होऊ शकत नाही की आम्ही राम मंदिरातल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण धुडकावलं. राम मंदिर ट्रस्टने आम्हाला निमंत्रण, आमंत्रण का दिलं नाही तो त्यांचा प्रश्न आहे. इतर तीन पीठांना आमंत्रण मिळालं आहे की नाही हे मला ठाऊक नाही. आम्हाला आमंत्रण मिळावं अशी अपेक्षा आम्ही करत नाही. आम्हाला आमंत्रण मिळालं तरीही आम्ही त्या सोहळ्याला जाणार नाही” असं अविमुक्तेश्वरनंद यांनी म्हटलं आहे. ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.
आम्हाला निमंत्रण मिळालं तरीही जाणार नाही
“राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण आलं तरीही आम्ही जाणार नाही कारण, शंकराचार्यांसमोर शास्त्रांचे नियम डावलून जर काही गोष्टी होत असतील तर आम्ही त्या सहन करु शकत नाही. जे धर्मकार्य करायचं आहे ते शास्त्रांच्या नियमांप्रमाणेच झाले पाहिजेत. जे धर्मशास्त्राच्या विरोधात आहे ते आम्ही सहन करु शकत नाही.”
मंदिर म्हणजे देवाचं रुप
“मंदिर हे देवाचं रुप असतं. देवाचं शरीर म्हणजे मंदिर आणि मूर्ती म्हणजे देवाचा आत्मा. त्यातला कळस हे देवाचं शीर आहे. आता शिखर म्हणजेच देवाचे डोळे तेदेखील तयार झालेले नाहीत. पायापासून ते कळसापर्यंत देवाच्या अंगांची प्रतिष्ठापना केली जाते. चेहरा, कळस हे काहीही तयार झालेलं नाही. फक्त धड तयार आहे त्यात प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं आहे. ही कुठलीही सामान्य चूक नाही. असंही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.”
गाभारा तयार आहे म्हणजे प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही
“गाभारा तयार आहे त्यामुळे प्राणप्रतिष्ठा होऊ शकते का? असं विचारलं असता शंकराचार्य म्हणाले, मंदिराचा गाभारा हा आईच्या गर्भाप्रमाणे असतो. गाभारा तयार झाला म्हणजे गर्भाशय तयार झालं. त्यातला देव समोर कसा येणार? त्यासाठी ९ महिने लागतात. त्यानंतर देवाचं दर्शन होतं. शरीर पूर्ण झालेलं नाही. मंदिराला शरीराचं रुपच धर्मात दिलेलं आहे ते दिलेलं नसताना प्राणप्रतिष्ठा कशी होईल?” असा प्रश्न शंकराचार्यांनी विचारला आहे.
पंचागांत २२ जानेवारी हा मुहूर्तच नाही
“२२ जानेवारी हा जर योग्य मुहूर्त असेल तर १०० कोटी लोक सनानती आहेत. ८० टक्के लोक मुहूर्त मानतात. त्यामुळे पंचाग खरेदी करण्याची, ते पाहण्याची पद्धत आजही रुढ आहे. तिथी पाहण्यासाठी, मुहूर्त पाहण्यासाठी पंचाग वापरलं जातं. सगळ्या संस्कारांसाठी पंचाग पाहिलं जातं. कुठल्याही एका पंचागात २२ जानेवारी प्राणप्रतिष्ठा साठी शुभ आहे हे दाखवा. संपूर्ण देशातले ज्योतिषी जे पंचाग छापतात, मुहूर्त देतात. त्यात कुणीही मुहूर्त लिहिलेला नाही. जर उत्तम मुहूर्त होता तर त्याचा उल्लेख पंचांगात का नाही? आम्ही १० ते १५ पंचाग आणून पाहिले त्यात २२ जानेवारीला कुठल्याही प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त नाही. जे ज्योतिषी आहेत ज्यांनी २२ जानेवारीचा मुहूर्त दिला. त्यांना जानेवारीतला मुहूर्त काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मी तो मुहूर्त दिला. त्यांना जो चांगला वाटला तो मुहूर्त त्यांनी दिला. यात त्या ज्योतिषांची काही चूक नाही असंही अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं आहे. आम्हाला आमंत्रण दिलं तर आम्ही अयोध्येपर्यंत गेलो असतो पण आम्ही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झालो नसतो. कारण आमंत्रण देवाकडून येतं ही आमची श्रद्धा आहे. चारही पीठांचे शंकराचार्य जाणार नाहीत. आम्ही डोळ्यांसमोर अधर्म होताना पाहू शकत नाही” असंही शंकराचार्यांनी म्हटलं आहे.