आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे वेळ पडल्यास आम्ही तुरुंगात जाऊ, पण एक रुपयाचाही दंड भरणार नाही, असे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
आर्ट ऑफ लिव्हिंगने यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात आयोजित केलेल्या जागतिक सांस्कृतिक महोत्सवाला राष्ट्रीय हरित लवादाने बुधवारी काही अटींवर मंजुरी दिली. त्याचवेळी या कार्यक्रमामुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाची भरपाई म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग प्रतिष्ठानला पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा दंड भरण्यास रविशंकर यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. यमुनेच्या तीरावर आयोजित करण्यात आलेला जागतिक महोत्सव सास्कृतिक ऑलिम्पिकसारखाच आहे. सर्वसाधारणपणे या उपक्रमांचे स्वागत केले जायला हवे, असेही रविशंकर म्हणाले.
दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपले काम चोखपणे न केल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने त्यांनाही एक लाख रुपयांचा आणि दिल्ली विकास प्राधिकरणाला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यमुना नदीमध्ये कोणतेही दुषित पाणी सोडण्यात येणार नाही आणि पर्यावरणाचा आणखी ऱ्हास होईल, अशी कोणतीही कृती करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र गुरुवारी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल करण्याचे आदेश आर्ट ऑफ लिव्हिंग प्रतिष्ठानला देण्यात आले आहेत. सदर कार्यक्रम यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात आयोजित करण्यात आल्यामुळे वाद उफाळून आला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा