सरकार सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्याचा राजकीय वापर करत आहे, असा आरोप करणाऱ्या विरोधकांना केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी प्रत्युत्तर दिले. कोणी जर आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही भारतीय लष्कराप्रमाणे शांत राहून ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू, असे नायडू यांनी म्हटले.
आम्हाला कोणाबरोबरही युद्ध किंवा भांडण करायचे नाही. मात्र, कुणी आम्हाला डिवचत असेल तर आम्ही भारतीय लष्कराप्रमाणे त्यांना जशास तसे उत्तर देऊ. काही लोकांना इतरांच्या मार्गात अडचणी आणायला आवडते. अशा लोकांना आम्ही शांतपणे हाताळू. आमच्या लष्कराने शांतपणे जसा सर्जिकल स्ट्राईक केला तसाच आम्हीदेखील करू, असे नायडू यांनी सांगितले. तसेच काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून (आप) सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे देण्याची करण्यात आलेली मागणीही त्यांनी फेटाळून लावली. भारतीय लष्कराची निष्ठा आणि बांधिलकीबद्दल कोणत्याही भारतीयाच्या मनात शंका असेल, असे मला वाटत नाही. त्यामुळे बेजबाबदार वक्तव्ये आणि मागण्यांवर उत्तर देण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दहशतवाद्यांविरोधात राबविलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. केजरीवाल यांनी सोमवारी मोदींचे या कारवाईसाठी अभिनंदन केले. तसेच पुरावे सादर करून पाकिस्तानचा खोटेपणा उघड करावा असे आवाहनही केले होते. मात्र, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केजरीवाल यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून प्रसिद्धी दिली. त्यामुळे केजरीवाल यांच्यावर चौफेर टीका होत आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान, विरोधकांच्या या आक्षेपांना केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले होते. केजरीवाल यांचा लष्करावर विश्वास आहे की पाकिस्तानच्या प्रचारतंत्रावर ,असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला होता. केजरीवाल यांनी जवानांचे नेतृत्व, धैर्य आणि बलिदान यांची थट्टा करू नये. पाकिस्तानी वर्तमानपत्रांमध्ये केजरीवाल यांच्या वक्तव्याला प्रसिद्धी मिळणे ही अतिशय लाजीरवाणी बाब असल्याचे प्रसाद म्हणाले. केजरीवाल यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानला भारताचा दावा खोडून काढण्याची संधी मिळाली आहे. भारताच्या कारवाईबाबत पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर केजरीवाल यांनी त्यावर मत वक्तव्य करून भारताचीच कोंडी केल्याचे प्रसाद म्हणाले.

Story img Loader