उद्योगपती विजय मल्ल्या यांना देशात परत आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्यावर वेगळ्या पद्धतीने प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. राज्यसभेमध्ये संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात जाऊन बसलेले विजय मल्ल्या यांना भारतात परत आणण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना मंगळवारी मोठा धक्का बसला. विजय मल्ल्या यांना भारतात पाठवू शकत नसल्याची माहिती ब्रिटनकडून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद यादव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अरूण जेटली म्हणाले, ब्रिटनमधील कायद्यानुसार एखाद्या परदेशी नागरिकांनी वैध पासपोर्टच्या आधारावर देशात प्रवेश केला असेल आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा पासपोर्ट रद्द करण्यात आला, तर त्या व्यक्तीचे थेट हस्तांतरण करण्यात येत नाही. यापूर्वीही ब्रिटनने अशा पद्धतीने व्यक्तीचे हस्तांतरण करण्याची मागणी फेटाळली होती. विजय मल्ल्या यांना परदेशात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले की ब्रिटन सरकारकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्यात येईल. त्या पद्धतीने विजय मल्ल्या यांना भारतात आणण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मल्ल्यांविरोधात आरोपपत्र दाखल झाल्यावर प्रत्यार्पणासाठी प्रयत्न – जेटली
राज्यसभेमध्ये संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता
Written by लोकसत्ता टीम
First published on: 11-05-2016 at 11:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will try to deport vijay mallya after chagesheet filed