‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीचं आयोजन ठाकरे गटाकडे देण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीचं संपूर्ण आयोजन पाहिलं. इंडियाची बैठक पार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपलं मनोगत मांडलं. त्यावेळी आमचा लढा हा जुमलेबाजीच्या विरोधात आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. बैठक संपल्यानंतर मनोगताचा जो कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय राऊत यांनी केलं. तसंच आदित्य ठाकरे यांनी बैठकीत काय ठराव झाले ते वाचून दाखवले. तर त्यानंतर एक छोटेखानी भाषण करत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी?
इंडियाच्या तिसऱ्या बैठकीसाठी आलेल्या सगळ्या मातब्बर नेत्यांचं मी स्वागत करतो. आज तिसरी मिटिंग झाली. दिवसेंदिवस इंडियाची बळकटी वाढते आहे. आता सत्ताधारी घाबरले आहेत. आमची विरोधकांची एकजूट नाही तर आम्ही सगळे देशप्रेमी एकत्र आलो आहोत. इंडिया हे नाव आम्ही घेतलं आहे. आता देशावर प्रेम न करणारे कोण हे सगळ्यांना माहित आहे. हुकूमशाहीच्या विरोधात, मनमानीच्या विरोधात आणि मित्र परिवारवादाच्या विरोधातही आम्ही लढणार आहोत. कारण सबका साथ सबका विकास हा नारा दिला जातो पण विकास फक्त मित्रांचा केला जातो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
हजार रुपये वाढवून २०० रुपये कमी केले
निवडणुकीच्या वेळी नारा दिला जातो सबका साथ हा विकास हा नारा दिला जातो. निवडणूक जिंकल्यावर नारा असतो मित्रोंका साथ और सबको लाथ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली आहे. गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या म्हणत आहेत. मात्र २०१४ पासून या किंमती पहिल्यांदा हे दर कमी केले. हजार रुपये वाढवायचे आणि २०० रुपये कमी करायचे याला काय अर्थ आहे? पाच वर्षांत लूट आणि निवडणुकीच्या वेळी सूट हे काय कामाचं. गॅस सिलिंडर स्वस्त केला पण त्यावर शिजवणार काय? डाळ महाग आहे, भाज्या महाग आहेत त्याकडे कोण लक्ष देणार? लोकांना हे सगळं समजतं आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
‘जुडेगा भारत और जितेगा इंडिया’ हा आमचा नारा आहे. आता आमचा लढा हुकुमशाहीच्या विरोधात आणि जुमलेबाजीच्या विरोधात आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच लोकांचाही पाठिंबा आम्हाला मोठ्या प्रमाणावर मिळतो आहे. त्यामुळे विजय आमचाच होईल असाही विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. कधीही घोषणा केली जाते, आज हे सुरु उद्या ते बंद. लोकांच्या मनात भय आहे. आता भयमुक्त भारतासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. लोकांनी मुळीच घाबरु नये असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.