Moral policing in Bengaluru: कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. उद्यानाबाहेर एक मुस्लीम युवती हिंदू मित्राबरोबर गप्पा मारत दुचाकीवर बसलेली असताना पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्याशी हुज्जत घालत मारहाण केली.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बुरखा घातलेली एक युवती हिंदू मुलासह दुचाकीवर बसून गप्पा मारताना दिसत आहे. त्यावेळी तिथे चार ते पाच जणांचे टोळके पोहोचते. या टोळक्यातील काही तरूण युवतीशी हुज्जत घालतात तर एक तरूण दोघांचा व्हिडीओ काढत असतो. या टोळक्यातील एक तरूण युवतीला उद्देशून म्हणतो की, तू याच्याबरोबर इथे बसली आहेस, हे तुझ्या घरातल्यांना माहिती आहे का? त्यानंतर ते युवतीसह बसलेल्या तरूणाला जाब विचारतात. तू इतर धर्मीय तरुणीबरोबर इथे का फिरत आहेस? यानंतर ते दोघांनाही धक्काबुक्की करतात.
या टोळक्यांनी दोघांनाही घेरल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ‘तुला लाज वाटते का?’, असे एक तरूण सदर युवतीला प्रश्न विचारतो. पोलिसांकडे सदर प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर पाच तरुणांना अटक करण्यात आली आहे.
“एका उद्यानाबाहेर दुचाकीवर सदर जोडपे बसलेले होते. यापैकी युवतीने बुरखा परिधान केलेला होता. या युवतीच्या तक्रारीनंतर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आरोपी टोळक्याची चौकशी सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त गिरीश यांनी दिली.
दरम्यान घटनास्थळी हिंसाचार झाल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये टोळक्याकडून दुचाकीवरील तरूणाला मारहाण झाल्याचे दिसत आहे. पोलीस उपायुक्त गिरीश यांनी सांगितले की, मुस्लीम मुलगी इतर धर्मीय मुलाबरोबर का बसली, एवढाच प्रश्न टोळक्याने जोडप्याला विचारला होता.
या घटनेनंतर कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे म्हणाले की, सरकार अशाप्रकारचे मॉरल पोलिसिंग सहन करणार नाही. हे काही बिहार, उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेश नाही. कर्नाटक हे प्रगतीशील राज्य आहे.