आपण आतापर्यंत अनेक वेबसीरिजमध्ये बनावट नोटा आणि त्याच्याभोवती घडणाऱ्या गुन्ह्यांचे कथानक पाहिले आहेत. मनी हाईस्ट, फर्जी, अशा काही सीरिजचा इथे उल्लेख करता येईल. अट्टल गुन्हेगार तर या सीरिजमधून प्रेरणा घेऊन गुन्ह्याचा पट तयार करत आहेत. अशीच एक थक्क करणारी घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातून नकली नोटा छापून चलनात आणल्याप्रकरणी काल (३ जुलै) सहा जणांच्या टोळीला अटक केली असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘फर्जी’ या वेबसीरिजला पाहून या टोळीला हे कृत्य करायचे सुचले असल्याचेही यावेळी तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अशी झाली अटक

पोलिसांना बनावटी नोटांच्या गैरकृत्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस सापळा रचून बसले होते. याचदरम्यान गोकाक तालुक्यातील कडबगट्टी येथे या टोळीचा शोध घेत असताना पोलिसांना आरोपींची एक कार सापडली. या कारमध्ये १०० रुपयांच्या ३०५ तर ५०० रुपयांच्या तब्बल ६,७९२ बनावट नोटा सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपींच्या अड्ड्यावर धाड टाकली. ही कार जप्त करण्यात आली आहे.

अटक केलेले आरोपी?

अनवर यादव, सद्दाम यडहळ्ळी, रवी हयागडी, डुंंडप्पा ओनशेवी, विठ्ठल होसकोटी आणि मल्लाप्पा कुंडली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी त्यांना आता अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर चौकशीतून हे पुढे आले आहे की मुदलगी तालुक्यातील अरभवी या छोट्याशा गावातील एका घरामध्ये आरोपींकडून रात्रीच्या वेळेला हा बनावट नोटा छापण्याचा कारभार सुरु होता.

‘फर्जी’ सीरिज पाहून चालवलं डोकं

आरोपींनी ‘फर्जी’ ही वेबसीरिज पाहून हे कृत्य केले असल्याचे तपास करत असलेल्या पोलीस अधीक्षकांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले आहे. फर्जी वेबसीरिजचे कथानक असेच बनावट नोटांशी संबंधित आहे.

हेही वाचा- Hathras Stamped: कोण आहेत भोले बाबा? उत्तर प्रदेश पोलिसात हवालदार ते स्वयंघोषित ‘बाबा’, ३० वर्षांपूर्वी सोडली नोकरी!

त्यातील कथानक पाहुनच ही नकली नोटा छापण्याची कल्पना सुचल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपींच्या अरभवी या गावातील छापखान्यातून बनावट नोटा, एक प्रिंटर, स्क्रीनिंग बोर्ड, पेंट, प्रिंटिंग पेपर आणि सहा मोबाईल फोन असे एकूण पाच लाख रुपये किंमतीचे सामान जप्त करण्यात आले असून गोकाक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुलेद यांनी दिली आहे.

एक लाख रुपयांना पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा

दरम्यान गुलेद यांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी ५ लाख रुपयांच्या बनावट नोटांच्या बदल्यात १ लाख रुपये घेत होती. हा सर्व प्रकार बागलकोट, महालिंगपूर, गोकाक आणि मुदलगी या ठिकाणी सुरु होता. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.