पाटण्यामध्ये गांधी मैदानावर झालेल्या साखळी स्फोटांना आठवडा उलटल्यानंतर झारखंड पोलीसांनी सोमवारी रात्री रांचीमधून नऊ जिवंत पाईप बॉम्ब जप्त केल्यामुळे खळबळ उडाली. ऐन दिवाळी सुरू असताना रांचीतील हिंदपिरी भागातून नऊ जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आले. पोलीसांनी १९ डिटोनेटर्स, २५ जिलेटिन स्टिक्स आणि बॉम्बला लावण्यात आलेली दोन घड्याळेही जप्त केली. रांचीतील पोलीस महानिरीक्षक एम. एस. भाटिया यांनी ही माहिती दिली. 
झारखंडचे पोलीस महासंचालक राजीवकुमार म्हणाले, पाटण्यामध्ये २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या साखळी स्फोटांमध्ये याच स्वरुपाचे टायमर वापरण्यात आले असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. एक लॉजमधील खोलीमधून हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही खोली लॉज मालकाने मुजिबुल अन्सारी नावाच्या एका विद्यार्थ्याला दिली होती. सध्या तो फरारी आहे.
इंडियन मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी हैदरअली हा सारखा या लॉजमध्ये येत होता, अशी माहिती पोलीसांनी दिली. पाटण्यातील स्फोटांचा आणि इंडियन मुजाहिदीनचा संबंध होता, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. याचा अधिक तपास करण्यासाठी विशेष कृतीगटाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये स्थानिक पोलीस, सीआयडी आणि विशेष शाखेतील अधिकाऱयांचा समावेश आहे, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितले.

Story img Loader