केंद्र सरकार आणि एनएससीएन (आयएम) यांच्यात झालेल्या शांतता कराराचे जम्मू-काश्मीरमधील सत्तारूढ पीडीपीने स्वागत केले आहे. हीच भूमिका काश्मीरमध्ये घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून पीडीपीने, पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी सुचविलेल्या चारसूत्री कार्यक्रमाचा सुरुवात म्हणून वापर करण्याची सूचना केली आहे.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील सर्व संबंधितांशी याच भूमिकेतून चर्चा करावी, सर्वाच्या भावनांचा, संस्कृतीचा आणि इतिहासाचा आदर करावा, असे पीडीपीचे प्रवक्ते मेहबूब बेग यांनी म्हटले आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मुशर्रफ यांच्यातील चर्चेच्या वेळी जो चारसूत्री कार्यक्रम समोर आला होता त्या अनुषंगाने चर्चेला सुरुवात करून अपेक्षित उद्दिष्ट साध्य करावे, असेही बेग यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
नागालॅण्डचे मुख्यमंत्री टी. आर. झेलिआंग आणि राज्यातील एकमेव खासदार नेइफू रिओ यांनी शांतता कराराचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला या कराराची माहिती दिली. मात्र त्याबाबतचा सविस्तर तपशील अद्याप समजलेला नाही, असे झेलिआंग म्हणाले. आर. एन. रवी या मध्यस्थामार्फत झालेल्या चर्चेच्या वेळी नागा नागरी संस्थांनी व्यक्त केलेल्या इच्छांचा करार करताना विचार करण्यात आला असेल, असा विश्वास झेलिआंग यांनी व्यक्त केला. हा करार ऐतिहासिक असल्याचे रिओ यांनी म्हटले आहे. करार झाल्यानंतर मोदी यांनी आपल्याशी संपर्क साधला आणि शांतता प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन केले, असेही रिओ म्हणाले.
माजी मुख्यमंत्री आनंदित
शांतता कराराचे नागालॅण्डचे माजी मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी स्वागत केले आहे. या करारामधील अटी आणि शर्ती अद्याप आपल्याला समजलेल्या नाहीत, मात्र अस्वस्थ नागालॅण्डमध्ये शांतता प्रस्थापित होणे, ही आनंदाची बाब आहे, असे झोरामथांगा म्हणाले.
देवेगौडा यांच्याकडून मोदींचे अभिनंदन
शांतता कराराबाबत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. या क्षेत्रात शांतता प्रस्थापित होण्याच्या कार्यातील हे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे देवेगौडा यांनी म्हटले आहे. आपण पंतप्रधान असताना नागा गटांशी चर्चेला सुरुवात झाली होती. नागा नेत्यांशी आपण स्वित्र्झलडमध्ये चर्चा केली होती आणि आपल्या सरकारने शांततेसाठी अनेक पावले उचलली होती, त्याचे या वेळी देवेगौडा यांनी स्मरण करून दिले.
तरतुदींबाबतची गोपनीयता संशयास्पद -गोगोई
शांतता कराराचे आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी स्वागत केले आहे. मात्र करारामधील तरतुदींबाबत गोपनीयता का पाळण्यात येत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. नागा गटांच्या अनेक वर्षांच्या संघर्षांला यश मिळाले आहे, त्यामुळे नागालॅण्डमध्ये शांतता प्रस्थापित होऊन राज्याची भरभराट होईल. मात्र करारतील तरतुदींबाबत गोपनीयता का पाळण्यात येत आहे, असा सवाल गोगोई यांनी केला. इतक्या महत्त्वाच्या करारातील तरतुदी अंधारात ठेवण्यात आल्याने त्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण होते. या करारामुळे कदाचित आसाम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशच्या हिताला बाधा तर येणार नाही ना, असाही संशय गोपनीयता पाळल्याने येतो, असेही ते म्हणाले.

Story img Loader