दिल्ली अबकारी प्रकरणात बीआरएस नेते के. कविता यांना तेलंगणात अटक केल्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. कविता तुरुंगात आल्यानंतर तिहारमध्ये बंद असलेला गँगस्टर सुकेश चंद्रशेखर याने स्फोटक पत्र जारी केले आहे. कविता यांना लिहिलेल्या पत्रात सुकेशने लिहिले, ‘अक्का…तिहारमध्ये तुमचे स्वागत आहे! तेलगूमध्ये अक्का म्हणजे मोठी बहीण.” गेल्या वर्षी त्याने दोन मोठे भाकीत केले होते, त्या दोन्ही आता पूर्ण झाल्या आहेत, असाही उल्लेख पत्रात आहे. तसंच, सुकेश चंद्रशेखर याने त्याच्या पत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उद्देशून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
के कविता यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखरने लिहिले, ‘प्रिय के. कविता, अखेर सत्याचा विजय झाला. राजकीय जादूटोणा, खोटे खटले, खोटे आरोप हे सारे नाटक फसले आहे. तुम्हाला वाटले की तुम्ही अजिंक्य आहात. तुम्हाला कोणी पकडू शकत नाही, पण तुम्ही नव्या भारताची ताकद विसरलात. आता कायदा पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि मजबूत झाला आहे. कायद्याच्या तावडीतून तुम्ही सुटू शकत नाही.
हेही वाचा >> वडील ‘आयसीयू’मध्ये दाखल झाल्याने गुजरातमधल्या काँग्रेसच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार
‘माझे दोन्ही अंदाज खरे ठरले’
सुकेश चंद्रशेखर यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले की, “गेल्यावर्षी मी एक पत्र जारी करून दोन मोठ्या भविष्यवाणी केल्या होत्या. पहिलं म्हणजे तेलंगणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत BRS सत्तेतून बाहेर पडणार आहे. दुसरा अंदाज असा होता की तिहार तुरुंगाचा एक भाग होण्यासाठी काऊंटडाऊन सुरू होईल. माझे हे दोन्ही अंदाज खरे ठरले.”
‘तुम्हाला तुमच्या कर्माचा हिशोब द्यावा लागेल’
सुकेश चंद्रशेखर यांनी पत्रात लिहिले आहे की, “तुमच्यावरील आरोपांना राजकीय शत्रुत्व आणि खोटे ठरवून तुम्ही स्वत:ला निर्दोष घोषित करण्याचा प्रयत्न करत आहात. पण माणूस त्याच्या कर्मापासून कधीच सुटू शकत नाही. त्याने केलेली कर्मे एक दिवस नक्कीच परत येतील. आता तुम्हाला तुमच्या सत्याच्या सामर्थ्याला सामोरे जावे लागेल आणि कायद्याला तुमच्या कर्माचा हिशेब द्यावा लागेल.