मोदी सरकारच्या हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले आहे. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील या निर्णयासाठी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.

मंगळवारी केंद्र सरकारने हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयावर शरद पवार यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मोदींचा हा निर्णय क्रांतिकारक असून यासाठी सरकारचे अभिनंदन केले पाहिजे असे ते म्हणालेत. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे बनावट नोटा,काळा पैसा बाहेर पडेल आणि देशाची प्रगती होईल असे हजारेंनी म्हटले आहे. आता काळा पैसा पांढरा होऊ नये यासाठी राजकीय पक्षाच्या देणग्यांचेही ऑडीट करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.निवडणूक आयोगाने दोन हजार रुपयांवरील देणग्यांवर लक्ष ठेवले पाहिजे असे हजारेंनी नमूद केले.मोदींचे कट्टर विरोधक आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीदेखील मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. सुरुवातीला काही दिवस सर्वसामान्यांना त्रास होईल, पण हा निर्णय घेण्याची गरज होती असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

शेअर बाजार तसेच सर्वसामान्यांवर या निर्णयाचे परिणाम दिसून येत आहे. यावर केंद्रीय अर्थसचिवांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही काळा पैशांवर लगाम लावण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. शेअर बाजारमध्ये कोणत्याही घटनांवर अशीच प्रतिक्रिया व्यक्त होते, आणखी काही काळ थांबा असे आवाहन अर्थसचिव अशोक लव्हासा यांनी केले आहे. लोकांना मोठे व्यवहार करणे सोपे व्हावे यासाठी २ हजार रुपयांची नोट आणल्याचे त्यांनी नमूद केले.